Pune: आरटीओतील कामासाठी घेतले साडेसात लाख रुपये; दलालाविरुद्ध गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Updated: November 28, 2023 14:46 IST2023-11-28T14:45:44+5:302023-11-28T14:46:25+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम मार्गी लावून देण्याच्या आमिषाने साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला....

Pune: आरटीओतील कामासाठी घेतले साडेसात लाख रुपये; दलालाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा सर्व कारभार हा एजंटच्या भरोशावर सुरु असतो. एजंटाशिवाय आरटीओतील कोणतेही काम पूर्ण करणे शक्य होत नाही, असा लोकांचा अनुभव आहे. त्यामुळे आरटीओतील कामांसाठी लोक नाईलाजाने एजंटकडे वळतात. पण आता एजंटच गंडा घालू लागले असल्याचे समोर आले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काम मार्गी लावून देण्याच्या आमिषाने साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दलालाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मिलिंद मधुकर भोकरे (रा. स्वारगेट) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत वाघोली येथील एका नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी प्रवासी वाहतुकीसाठी वापरली जाणारी मोटार खासगी वापरासाठी परवानगी देण्याबाबतचा अर्ज प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दिला होता. आरटीओतील काम करुन देण्याच्या आमिषाने भोकरेने त्यांच्याकडून १ लाख ४५ हजार ६०० रुपये घेतले. त्यांच्याकडून वाहनाची कागदपत्रे घेतली. त्यानंतर भोकरे याने त्यांचे काम करुन दिले नाही. पैसे परत करण्याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ केली.
भोकरेने अशाच पद्धतीने आणखी पाच जणांची फसवणूक केल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. भोकरेने याने फिर्यादी यांच्यासह पाच जणांची ७ लाख ४३ हजार ५५० रुपयांची फसवणूक केली असून, पोलीस उपनिरीक्षक नळकांडे तपास करत आहेत.