सेट परीक्षा २६ सप्टेंबरला होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST2021-05-14T04:10:22+5:302021-05-14T04:10:22+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पुणे विद्यापीठानेसुद्धा जुलै महिन्यात सेट परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, महाराष्ट्रातील ...

सेट परीक्षा २६ सप्टेंबरला होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. पुणे विद्यापीठानेसुद्धा जुलै महिन्यात सेट परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन विद्यापीठाने ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेण्याचे निश्चित केले. सप्टेंबर महिन्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली तरच सेट परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार पुणे विद्यापीठातर्फे सेट परीक्षेचे नियोजन केले जाते. यूजीसीच्या समितीकडून विद्यापीठाला तीन परीक्षा घेण्याची मान्यता दिली आहे. त्यातील सप्टेंबर महिन्यात होणारी परीक्षा ही तिसरी व शेवटची आहे. पुढील परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाला पुन्हा यूजीसीकडून मान्यता घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्यात होणारी परीक्षा पूर्वीप्रमाणेच ‘ओएमआर’शीटवर ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.
विद्यापीठातर्फे आत्तापर्यंत ३६ सेट परीक्षा घेण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात होणारी सेट परीक्षा ही ३७ वी आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी १० जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर त्यांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी ११ ते १९ जूनपर्यंत मुदत देण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना १६ सप्टेंबरपासून परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून दिले जातील, असे विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.