शिरूर : शिरूर शहरात कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्याच्या दृष्टीने कुठलेही मतभेद व राजकारण न करता सर्व नागरिकांनी या परिस्थितीशी लढा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन शिरूर नगर परिषद सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी केले आहे.
शिरूर नगरपरिषद येथील रसिकभाऊ धारिवाल सभागृह येथे शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, मुख्याधिकारी महेश रोकडे व नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
धारिवाल म्हणाले की, शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण आहेत. हे रुग्ण वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्याबाबत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याशी चर्चा झाली असून, शिरूर शहरातील नागरिकांसाठी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
--
चौकट
गरज पडल्यास ३५० बेडचे कोविड सेंटर सुरू करणार
नगर परिषद
मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले की,
शिरूर शहरातील कोरोना रुग्णांची माहिती व त्या भागात नोटीस देऊन संबंधितांना फिरण्यास प्रतिबंध करण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने दहा वाॅर्डांमध्ये नगरपरिषद शाळेतील शिक्षक व कर्मचारी असे एकशे चाळीस कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार केली आहेत. सी. टी. बोरा कॉलेज येथे कोविड सेंटर सुरु असून, तेथे एकशे पन्नास बेडची सोय आहे. गरज भासल्यास समाजकल्याण वसतिगृह आणि थिटे महाविद्यालय येथे ३५० बेडचे कोविड सेंटर करण्यात येईल.
--
२४ शिरुर नगरपरिषद बैठक
फोटो : वाढत्या कोरोना रुग्ण व त्यांची सुविधा याबाबत शिरूर नगरपरिषदेत आयोजित बैठकीत नगराध्यक्षा वैशाली वाखारे, सभागृह नेते प्रकाश धारीवाल, मुख्याधिकारी महेश रोकडे आदी.