वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 06:09 IST2025-12-12T06:07:33+5:302025-12-12T06:09:25+5:30
गडचिरोलीतील सेवाकाळात त्यांनी काही गंभीर गुन्ह्यांची उकल केली. तसेच नक्षली कारवायांवर प्रभावी नियंत्रण ठेवले. दोन महत्त्वाच्या खुनांच्या प्रकरणांत त्यांच्या तपास कौशल्याची विशेष दखल घेतली गेली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पांडुरंग भोसले (वय ५२) यांचे कॅन्सरने निधन झाले. ते पुणे शहर गुन्हे शाखेत कार्यरत होते. त्यांच्या निधनाने पोलीस दलात मोठी शोककळा पसरली आहे.
भोसले यांची कारकिर्द पोलिस हवालदार म्हणून सुरू झाली होती. १९९४ मध्ये ते पोलीस हवालदार म्हणून पोलिस दलात रुजू झाले होते. त्यानंतर खात्या अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण करून २००४ मध्ये ते उपनिरीक्षक, तर २०१७ मध्ये पोलीस निरीक्षकपदी पदोन्नत झाले. गडचिरोली, पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि आर्थिक गुन्हे शाखा अशा महत्त्वाच्या विभागांत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
गडचिरोलीतील सेवाकाळात त्यांनी काही गंभीर गुन्ह्यांची उकल केली. तसेच नक्षली कारवायांवर प्रभावी नियंत्रण ठेवले. दोन महत्त्वाच्या खुनांच्या प्रकरणांत त्यांच्या तपास कौशल्याची विशेष दखल घेतली गेली. वारजे पोलीस ठाण्यात कार्यरत असताना खून, दरोडा, अपहरण, बलात्कार यांसह विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करून ४०० पानांपेक्षा अधिक आरोपपत्र सादर करण्याची उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली.
पुणे जिल्ह्यातील यवत येथील सुपा घाट परिसरात रेकॉर्डवरील आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात असताना आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केला होता. एक गोळी त्यांच्या डाव्या हातातून आरपार गेली. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ त्यांनी केलेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला. या धाडसी कामगिरीबद्दल त्यांच्या राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकासाठी शिफारस करण्यात आली होती.