चोरीच्या मोबाईलची रस्त्यावर विक्री?
By Admin | Updated: May 24, 2014 05:13 IST2014-05-24T05:13:20+5:302014-05-24T05:13:20+5:30
गावाकडे जायचे आहे, बसभाड्यासाठी पैसे नाहीत, अडचणीत आहोत, असे सांगून आपल्याकडील मनगटी घड्याळ, रेडिओ, कॅमेरा घ्या; पण थोडे पैसे द्या, अशी विनवणी करणार्या महिला नेहमी दिसून येत असत.

चोरीच्या मोबाईलची रस्त्यावर विक्री?
पिंपरी : गावाकडे जायचे आहे, बसभाड्यासाठी पैसे नाहीत, अडचणीत आहोत, असे सांगून आपल्याकडील मनगटी घड्याळ, रेडिओ, कॅमेरा घ्या; पण थोडे पैसे द्या, अशी विनवणी करणार्या महिला नेहमी दिसून येत असत. पाचशे रुपये किमतीचे घड्याळ अवघ्या दोनशे रुपयांना देण्यास तयार आहोत, असा आगळावेगळा मार्केटिंग फंडा वापरून निकृष्ट दर्जाची वस्तू गळ्यात मारली जात असे. तोच फंडा वापरून आता भर रस्त्यात अशाच पद्धतीने ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल विकले जात आहेत. ते मोबाईल चोरीचे असल्याची शंका उपस्थित केली जात आहे. वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे खेड्यातील महिलेचा पेहराव असलेली महिला आपल्या लहान मुलीसमवेत मोबाईल विक्री करत असल्याचे आढळून आले. गावाला जाण्यासाठी बसभाड्याचे पैसे नाहीत. अडचण आहे. आमच्याकडे मोबाईल हँडसेट आहे, तो घेऊन पैसे द्या. बाजारपेठेत तीन ते चार हजार रुपये किंमत असलेला मोबाईल तुम्ही एक हजारात घ्या, अशी विनवणी करीत असल्याचे गुरुवारी निदर्शनास आले. ही महिला शक्यतो महाविद्यालयीन तरुण-तरुणी दिसल्यानंतर त्यांच्याजवळ जाते. त्यांना ही नेहमीची कॅसेट वाजवून मोबाईल घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत होती. ब्रॅँडेड कंपनीचे चार ते पाच हजार रुपये किमतीचे मोबाईल अवघ्या एक हजारात मिळत असल्याने त्या महिलेजवळ गर्दी झाली. गावाला जायचे आहे. बसभाड्याला पैसे नाहीत, ही अडचण दूर करण्यासाठी आपल्याकडील एखादा मोबाईल कमी किमतीला विकणे समजण्यासारखे आहे. परंतु एकापेक्षा अनेक व्यक्ती मोबाईल घेण्यास आल्यानंतर पिशवीतून अनेक मोबाईल काढले जाऊ लागले, तेव्हा ही महिला अडचणीत नसून अडचणीत आणू शकते, हे काहींच्या लक्षात आले. हँडसेट घ्यायचा असेल, तरी दुकानात डमी मॉडेल दाखवले जाते. बॉक्स उघडून मोबाईल हँडसेट हातात दिला जात नाही. कमीत कमी किमतीचा, तसेच महागडा मोबाईलसुद्धा हातात दिला जात नाही. खरेदी करणार असाल, तरच बॉक्स उघडून हँडसेट दाखवतो, असे दुकानदार अथवा सेल्समन सांगतो. मोबाईल खरेदीच्या तयारीने खिशात पैसे घेऊन गेले असले, तरी जोपर्यंत मोबाईल घेण्याबद्दल ग्राहक निश्चितपणे सांगत नाही. तोपर्यंत पाहण्यासाठीसुद्धा दुकानदार त्याच्या हातात मोबाईल देत नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील चौकाचौकांमध्ये मात्र किमती मोबाईल, भाजीच्या दराप्रमाणे कमी किमतीचा दर ठरवून मोबाईल खरेदी करता येतो. ही बाब कमी किमतीत मोबाईल घेण्यास गेलेल्यांना खटकली. चोरीचा मोबाईल असावा, अशी शंका काहींनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)