Maharashtra: रिक्त जागांसाठी चार वर्षांनी निवड यादी; शिक्षकभरती २०१९ मधील उमेदवारांची शिफारस
By प्रशांत बिडवे | Updated: November 30, 2023 19:43 IST2023-11-30T19:36:25+5:302023-11-30T19:43:53+5:30
पदभरती दरम्यान, रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले हाेते...

Maharashtra: रिक्त जागांसाठी चार वर्षांनी निवड यादी; शिक्षकभरती २०१९ मधील उमेदवारांची शिफारस
पुणे : राज्यात २०१९ मध्ये पार पडलेल्या शिक्षक पदभरतीमध्ये अपात्र, गैरहजर, रुजू न होणे आदी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी उमेदवारांच्या निवडीची शिफारस करण्यात आली आहे. पदभरती दरम्यान, रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले हाेते. त्यातील शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी व्यवस्थापनाकडे संपर्क साधावा, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी- २०१७ नुसार पवित्र पोर्टलमार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या तसेच खासगी शैक्षणिक संस्थातील मुलाखतीसह पदभरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. दरम्यान, २०१९ मधील पदभरतीदरम्यान विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्य क्रम घेण्यात आले हाेते. स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी व्यवस्थापनाच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे.
उमेदवारांनी पवित्र पाेर्टलवर वैयक्तिक खात्यावर लाॅगीन केल्यानंतर अॅप्लिकंट रेकमेंडेड स्टेटसवर वर क्लिक करावे. त्यानंतर व्ह्यू रेकमंडेड इन्स्टिट्यूट लिस्टमध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद त्यांना दिसेल. व्ह्यू प्रेफरन्सवाईज स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम दिसेल. त्यानुसार आपण शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधता येईल. उमेदवाराच्या निवडीसाठी रिक्त पदांच्या जाहिरातीतील त्याच्या प्रवर्गाचे / खुल्या प्रवर्गाचे (समांतर आरक्षण) गुण व जाहिरातीच्या संबंधित गटातील विषयाचे गुण कटऑफ गुणांपेक्षा अधिक गुण आवश्यक आहेत. उमेदवारांना काही अडचण असल्यास त्यांनी edupavitra@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.