४३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई
By Admin | Updated: March 29, 2017 02:25 IST2017-03-29T02:25:14+5:302017-03-29T02:25:14+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या चार दिवसांत मालमत्ताकराची थकबाकी असलेल्या शहरातील ४३ मालमत्तांवर जप्तीची

४३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गेल्या चार दिवसांत मालमत्ताकराची थकबाकी असलेल्या शहरातील ४३ मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली.
राज्य शासनाचा आदेश मिळताच मिळकतकर विभागाने कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. महापालिका क्षेत्रात करसंकलन विभागाकडे चार लाख पन्नास हजार मिळकतींची नोंद असून, त्यांपैकी तीन लाख सहा हजार ८९८ मिळकतधारकांनी ३७१ कोटींचा भरणा केला आहे. करसंकलन विभागामार्फत दिनांक सात मार्चअखेर दहा हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या सुमारे ६५ हजार जणांना नोटीस बजाविण्यात आली असून, सुमारे ४२ हजार मिळकतधारकांना जप्तीपूर्वीची नोटीस बजावली आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने करबुडव्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे, प्रशासन अधिकारी संदीप खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक मंडलाधिकारी प्रमोद काशिकर, अलका तांबे, जयश्री साने यांनी ही कारवाई केली. निगडी विभागाकडील पाच मोबाइल टॉवरची ३२ लाखांची थकबाकी असलेल्या बिगरनिवासी मिळकतीवर पथकाने मिळकतजप्तीची कारवाई केली. महापालिका करसंकलन विभागामार्फत २२ मार्चपासून मालमत्ता जप्तीची मोहीम राबविण्यात येत आहे. ७ मार्चअखेर १० हजार रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ४२ हजार ३४५ मालमत्ताधारकांना जप्तीपूर्वीची नोटीस बजावण्यात आली. (प्रतिनिधी)
आजअखेर करसंकलन विभागाकडे ४ लाख ४९ हजार ८१२ मालमत्तांची नोंद असून, त्यांपैकी तीन लाख आठ हजार मालमत्ताधारकांनी ३७६ कोटी पाच लाख रुपये मालमत्ताकराचा भरणा केला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ३१ मार्चपर्यंत सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती करसंकलन विभागाचे सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.