पुणे : सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्याने पत्नीच्या मदतीने प्रधानमंत्री धुणे भांडी कामगार योजनेचे काही रक्कम गुंतविल्यास भरमसाठ बिनव्याजी कर्ज १५ दिवसात मंजूर करुन देतो, असे सांगून लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका दाम्पत्याला अटक केली आहे.
हिरालाल मधुकर आगज्ञान (वय ४०) आणि सपना हिरालाल आगज्ञान (वय ३०, दोघे रा. अष्टविनायकनगर, आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी महेश माधव मंडावले (वय ५०, रा. अष्टविनायकनगर, आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल आगज्ञान हा येथील एका सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहत होता. त्याने पत्नीच्या मदतीने आम्ही प्रधानमंत्री धुणे भांडी कामगार योजनेचे सरकारमान्य काम पहात आहे. गोर गरीब व मजुरांना त्यांनी काही रक्कम गुंतवली की भरमसाठ बिनव्याजाने १५ दिवसात कर्ज मंजूर करुन देतो. तुम्ही आमचे सभासद होऊन कर्ज घेतले आणि तुम्ही आणखी दोन जणांना आमच्याकडे कर्ज घेण्यासाठी आणल्यास तुम्हाला घेतलेल्या कर्जाचा एक हप्ता माफ होणार आहे, अशी साखळी पद्धतीने आम्ही योजना राबवत असल्याचे त्याने लोकांना सांगितले. सुरुवातीला त्याने योजनेत सहभागी होण्यासाठी फॉर्मचे प्रत्येकी ३०० रुपये घेतले. तो फॉर्म भरुन घेतल्यावर त्यांना तुम्ही आमच्याकडे १५ हजार रुपये गुंतविले तर तुम्हाला १५ लाख रुपयांचे कर्ज मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानुसार काहींनी १५ हजार रुपये तर काहींनी १० हजार रुपये गुंतविले. नोव्हेबर २०२० पासून हा प्रकार सुरु झाला होता. काही महिने झाले तरी कर्ज मिळत नसल्याचे पाहून लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड यांनी सांगितले की, या पती- पत्नीने आतापर्यंत १३ जणांना ३ लाख ३२ हजार ३०० रुपयांना फसविल्याचे समोर आले आहे. त्यांनी आणखी काही जणांना फसविले असल्याची शक्यता आहे. दोघांना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.