कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तमाशा कलावंतांची पुन्हा एकदा उपासमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST2021-04-03T04:09:57+5:302021-04-03T04:09:57+5:30
खोडद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तमाशा फडमालक व फडातील कलावंतांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तमाशा कलावंतांची पुन्हा एकदा उपासमार
खोडद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तमाशा फडमालक व फडातील कलावंतांवर पुन्हा एकदा उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने शासनाने यात्रांवरील बंदी कायम केल्याने पर्यायाने तमाशा फडमालक व कालावंतांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी देखील यात्रा रद्द झाल्याने तमाशा कलावंत व मजुरांसमोर जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यात्रा रद्द झाल्याने या वर्षी होणारी कोट्यवधी रुपयांची होणारी उलाढालदेखील थांबली आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जानेवारीपासून गावोगावच्या यात्रा सुरू होतात.या यात्रांमध्ये मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून तमाशा ठेवला जातो. दरवर्षी नारायणगाव येथे एक महिना आधी राज्यातील सर्व तमाशा फडमालकांच्या राहुट्या लागल्या जातात. सुमारे ५० फडमालकांच्या राहुट्या लागल्या जातात.जिल्ह्यातील अनेक गावागावातून नागरिक तमाशा ठरविण्यासाठी येथे येतात व तमाशाची सुपारी दिली जाते.
अनेक तमाशा फडमालक कर्जबाजारी आहेत.अनेक फडमालक कर्ज काढून यात्रांसाठी हंगामी फड सुरू करतात.फडमालक यात्रा हंगामासाठी अनेक नवीन कलाकार व मजूर उचल देऊन घेतात.वर्षभर कलावंतांना व मजुरांना सांभाळावे लागते.यात्रांच्या सुपाऱ्या मिळाल्यानंतर तमाशा फडमालक आपापले व्यवहार सुरळीत करून घेतात.
गुढी पाडवा ते वैशाखपौर्णिमेपर्यंत यात्रांचा हंगाम असतो.पुणे ,नाशिक, सातारा, अहमदनगर, सांगली,श्रीगोंदा, संगमनेर, सोलापूर ग्रामीण या भागांत मोठ्या प्रमाणात यात्रा असतात.गुढी पाडव्यापासून वैशाख पौर्णिमेपर्यंत सर्व यात्रांच्या सुपाऱ्या ठरल्या जातात.या काळात १०० कोटींच्या आसपास उलाढाल होत असते.तमाशा फडांना पुणे जिल्ह्यातील यात्रांच्या सुपाऱ्या अधिक असतात आणि नेमके पुणे जिल्ह्यातच कोरोनाचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे सर्वाधिक आर्थिक फटका तमाशा फडांना बसणार आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ मार्च २०२० रोजी जिल्ह्यात लॉकडाऊन लागू झाला. गावोगावच्या यात्रा उत्सवांवर बंदी आली. यावेळी ज्या ज्या गावच्या यात्रांसाठी तमाशाच्या सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या.मार्च महिन्याच्या मध्यात सुमारे २०० सुपाऱ्या गेल्या वर्षी रद्द झाल्या होत्या.यामुळे गेल्यावर्षी सुमारे ५० कोटींचा फटका फडमालकांना बसला होता.एका फडात साधारणपणे १०० ते १५० कलावंत व मजूर असतात.तमाशाचे साहित्य वाहण्यासाठी ८ ते १० गाड्या असतात.एका रात्रीच्या कार्यक्रमासाठी फडमालकाला सुमारे ८० हजार रुपये ते एक लाख रुपये खर्च येतो. लहान आणि कमी कलावंत असलेल्या तमाशा फडाची सुपारी ७० हजार रुपयांपासून सुरू होते. एखादा नावाजलेला फड असेल तर त्याची सुपारी ३ लाख रुपयांपर्यंत दिली जाते.
गेल्या वर्षी अनेक फडमालकांनी आपापल्या कलावंत व मजुरांना त्यांच्या त्यांच्या गावी पाठवून दिले होते. या वेळी या कलावंत व मजुरांनी अक्षरशः धुणीभांडी करून आपला उदरनिर्वाह केला होता.
मागील ६० वर्षांच्या काळात पहिल्यांदाच अशी वेळ तमाशा क्षेत्रावर आली आहे.
मायबाप सरकार आम्हांला वाचवा...!
"२००९ व २०१३ -१४ ला अनुदान दिले होते. तंबूच्या पूर्णवेळ फडांना भाग भांडवली ८ लाख तर हंगामी फडांना ४ लाख रुपये अनुदान शासनाने दिले होते.२००९ ला दिलेल्या अनुदानाप्रमाणेच शासनाने आम्हांला जिवंत राहण्यासाठी या वर्षी देखील अनुदान द्यावे.तमाशा फडातील कलावंत व मजूर यांच्यावर धुणीभांडी व मोलमजुरी करून जगण्याची वेळ आली आहे.ज्या प्रमाणे नाटकाला व चित्रपटांना प्रयोगी अनुदान दिले जाते त्याचप्रमाणे तमाशा फडांना देखील अनुदान मिळावे.महाराष्ट्राची लोककला जपली पाहिजे केवळ असे म्हणून चालणार नाही तर ही लोककला जपण्यासाठी व जगविण्यासाठी थेट मदतीची गरज आहे.मायबाप सरकारने आम्हांला वाचवावे हीच कळकळीची विनंती आहे." - मोहित नारायणगावकर, संचालक
विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर तमाशा मंडळ