दुसऱ्या लग्नाची हौस पडली महागात
By Admin | Updated: July 27, 2015 03:35 IST2015-07-27T03:35:49+5:302015-07-27T03:35:49+5:30
तिच्या पतीचे निधन झाले... आईची तगमग बघून मुलगी हेलावली... तिने आईला दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरला... त्यानुसार आईने नेटवरून वर शोधायला सुरुवात केली

दुसऱ्या लग्नाची हौस पडली महागात
पुणे : तिच्या पतीचे निधन झाले... आईची तगमग बघून मुलगी हेलावली... तिने आईला दुसऱ्या लग्नाचा आग्रह धरला... त्यानुसार आईने नेटवरून वर शोधायला सुरुवात केली... लंडनच्या एकाने तिच्याशी लग्नाची तयारी दर्शवली... लग्नाच्या भूलथापा देत त्याने या महिलेला ४३ लाखांचा गंडा घातला... ही घटना घडली आहे गुलटेकडी येथील सॅलिसबरी पार्कमध्ये. स्वारगेट पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
स्वारगेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा रिक्र्रूटमेंटचा व्यवसाय असून, तिची मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. पतीच्या निधनानंतरही या महिलेने जिद्दीने व्यवसाय पुढे नेला. त्यांच्या मुलीचे लग्न जुळले असून, काही दिवसांत त्यांचे लग्न होणार आहे. लग्नानंतर आपली आई एकट्याने आयुष्य जगणार म्हणून तिनेच आईकडे लग्नाचा आग्रह धरला. चांगला जोडीदार शोधण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे या महिलेने मुलीच्या आग्रहाखातर नेटवरील लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावर वर शोधायला सुरुवात केली. लंडन येथील रोमन बिझुस या व्यक्तीने त्यांच्याशी लग्नाची तयारी दर्शवली. त्याने दिलेला प्रस्ताव या महिलेनेही मान्य केला. त्यानंतर त्यांचे फोनवर बोलणे आणि आॅनलाइन चॅटिंग सुरू झाले.
या महिलेच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्याने वाढदिवसाची भेट पाठवत असल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार १२ ते १९ जूनदरम्यान सुरू होता.
त्यांना १२ जून रोजी लंडनमधून प्रियंका नावाच्या मुलीने फोन केला. बँक आॅफ अमेरिकामधून बोलत असल्याचे सांगत तुमच्या नावाने एक गिफ्ट आले असून, त्यामध्ये लॅपटॉप, हिऱ्याचे दागिने, आयफोन तसेच काही रक्कम असल्याची थाप तिने मारली. हे गिफ्ट सोडवण्यासाठी कस्टम ड्युटीचे पैसे भरायला सांगण्यात आले.
या संदर्भात या महिलेने बिझुस याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानेही पैसे भरण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून या महिलेने नेट बँकिंगद्वारे आरोपीच्या खात्यावर पैसे भरले. (प्रतिनिधी)