शहरात १ मार्च पूर्वी पहिला डोस घेतलेल्यानाच उद्यापासून दुसरा डोस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:32+5:302021-05-15T04:09:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांना आता दुसरा डोस हा १२ ते १६ आठवड्यानंतरच मिळणार आहे. ...

शहरात १ मार्च पूर्वी पहिला डोस घेतलेल्यानाच उद्यापासून दुसरा डोस मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांना आता दुसरा डोस हा १२ ते १६ आठवड्यानंतरच मिळणार आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीची अंमलबाजवणी शहरात उद्यापासूनच होणार आहे. यामुळे ज्या नागरिकांनी १ मार्च पूर्वी कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनाच उद्यापासून दुसरा डोस दिला जाणार आहे.
कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतल्यावर प्रारंभी २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल, तद्नंतर ४५ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल, असे जाहीर केले होते. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीची परिणामकता अधिक प्रभावी होण्यासाठी आता दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचा कालावधी असावा, असे जाहीर केले आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच २८ दिवस व नंतर ४५ दिवसानी नागरिकांनी दुसऱ्या डोससाठी यावे असे प्रत्येक केंद्रावर सांगितले जात होते. आता १२ ते १६ आठवडे कालावधी नंतरचे नियम आल्याने नागरिकांना कसे समजून सांगायचे, असा प्रश्न केंद्रावरील कर्मचारी व माननीयांना पडला आहे.
--
उद्यापासून कोव्हिशिल्डचा कुठलाच डोस मिळणार नाही
महापालिकेला राज्य शासनाकडून कोव्हिशिल्डचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे आहे, त्या लसही आज संपल्या आहेत. नवीन लसपुरवठा झाल्याशिवाय लसीकरण उद्यापासून ठप्प राहणार आहे. तर नवीन डोस आले तरी ते १ मार्च पूर्वी लस घेतलेल्यानाच दुसरा डोस म्हणून दिले जाणार आहेत.
--
उद्या १४ केंद्रावर कोव्हॅक्सिन डोस
महापालिकेला गुरुवारी रात्री उशिरा कोव्हॅक्सिनचे ३ हजार डोस प्राप्त झाले. उद्या ज्या नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बाकी आहे त्यांना तो १४ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून दिला जाणार आहे. या करिता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय एका लसीकरण केंद्राची निवड केली जाणार आहे.