कोरोनाच्या लसीकरण मोहिमेत दुसऱ्या डोसला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:10 IST2021-05-15T04:10:16+5:302021-05-15T04:10:16+5:30
यवत : पुणे जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण परत एकदा सुरू झाले असून, चालू आठवड्यात लसीकरणाचा वेग वाढविला जाणार आहे. ...

कोरोनाच्या लसीकरण मोहिमेत दुसऱ्या डोसला प्राधान्य
यवत : पुणे जिल्ह्यात कोरोनाचे लसीकरण परत एकदा सुरू झाले असून, चालू आठवड्यात लसीकरणाचा वेग वाढविला जाणार आहे. त्यामध्ये ४५ वर्षांच्या वरील नागरिकांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य देणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.
बुधवार (दि. १२) रोजी दौंड तालुक्यातील लसीकरण केंद्रांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
मागील काही दिवसांपासून लसीकरण बंद असल्याने नागरिक हवालदिल झाले होते. एकीकडे राज्यात १८ वयाच्या पुढील सर्वांना लसीकरण सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, त्यानंतर लसीचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी लसीकरण बंदच होते.
यवत येथील लसीकरण केंद्रात डॉ. पवार यांनी भेट दिल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या. पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस वेळेत मिळणार की नाही, याबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. यातच लस वाटप करताना योग्य नियोजन नसल्याचे अनेक ठिकाणी दिसते यातून नागरिकांना तसन् तास वाट पाहत बसावे लागते. त्यादरम्यान अनेकांना कोरोनाचा धोका संभवत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या वेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समिती सदस्या नीशा नीलेश शेंडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ, सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे, इम्रान दोरगे, गौरव दोरगे, गणेश शेळके, मनोहर खुटवड, राजेंद्र शेंडगे आदी उपस्थित होते.
--
चौकट
यवत गावातील मोठी लोकसंख्या लक्षात घेता लसीचे डोस अधिक संख्येने मिळणे गरजेचे आहे. खामगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने तेथे लस उपलब्ध झाल्यास तेथील स्थानिक प्राधान्याने लस घेतात. मात्र, यवतमधील नागरिक उपेक्षित राहतात. यामुळे लसीचे वाटप करताना अधिकची लोकसंख्या विचारात घ्यावी, अशी मागणी या वेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम यांनी केली.
--
फोटो क्रमांक - १४यवत लसीकरण भगवान पवार
फोटो ओळ : यवत येथे लसीकरण केंद्रात माहिती घेताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, या वेळी उपस्थित जि. प. सदस्य गणेश कदम, नीशा शेंडगे, सरपंच समीर दोरगे, सदानंद दोरगे आदी.