सत्याचा शोध म्हणजे गुरूतत्वयोग : अभयकुमार सरदार; पुण्यात स्मरणिका प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:33 IST2018-02-09T12:24:25+5:302018-02-09T12:33:17+5:30
जीवनातील सत्याचा शोध म्हणजे गुरुतत्त्वयोग, असे गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी सांगितले. गुरुतत्त्वयोग संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरदार बोलत होते.

सत्याचा शोध म्हणजे गुरूतत्वयोग : अभयकुमार सरदार; पुण्यात स्मरणिका प्रकाशन
पुणे : माणूस हा प्राणी सर्वगुणसंपन्न असूनही तो दु:खी आहे. समाजात एकीकडे मोठ्या इमारती उभ्या आहेत तर दुसरीकडे लोकांना दोन वेळचे अन्न देखील मिळत नाही. अशी परिस्थिती का निर्माण झाली, याचे उत्तर शोधण्यासाठी गुरुतत्त्वाचे मार्गदर्शन गरजेचे आहे. गुरुतत्त्वातूनच संपूर्ण जीवनाचे आकलन होते. जीवनातील सत्याचा शोध म्हणजे गुरुतत्त्वयोग, असे गुरुतत्त्वयोग प्रणालीचे प्रणेते अभयकुमार सरदार यांनी सांगितले.
गुरुतत्त्वयोग संस्थेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सरदार बोलत होते. या वेळी गुरुतत्त्ववेध या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा देशपांडे, अभयकुमार सरदार, श्रीपाद पेंडसे, अरुण राजे, तेजा दिवाण यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचे देखील उद्घाटन यावेळी करण्यात आले. गुरुतत्त्वयोग संस्थेचे विश्वस्त श्रीकृष्ण चितळे तसेच साधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरदार म्हणाले, ‘गुरुतत्त्व समजून घेवून ते आत्मसात केले तर आपण सहज जाणिवेत जातो आणि संपूर्ण जीवनाचे आकलन होते. गुरुतत्त्वयोग हा विशिष्ट जात, धर्म, पंथ, विशिष्ट समाज किंवा माणसापुरता मर्यादित नाही. गुरुतत्त्व स्वत: आत्मसात करून इतरांना त्यासाठी प्रेरीत करणे, ही सामाजिक गरज आहे. गुरुतत्त्वाचा विचार लोकांपर्यंत पोहचवला तर समाजात बदल घडेल.’
सुषमा देशपांडे म्हणाल्या, ‘महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभ्यास करीत असताना मी त्यांची तत्त्वे आपोआप आत्मसात करू लागले. स्वत: स्वत:शी संवाद साधणे हा माझ्या लेखनाचा मुख्य भाग आहे. आपण स्वत:शी संवाद साधत जगलो तर भूतकाळ आणि भविष्याच्या पलीकडे जाऊन जगू शकतो. वर्तमानात जगताना स्वत:शी संवाद साधत, स्वत:चा शोध घेणे महत्त्वाचे आहे.’
गुरुतत्त्वाला अनुसरुन विविध विषयांवर प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते. तेजा दिवाण यांनी सूत्रसंचालन केले.