बारामतीत भाविकांची स्कॉर्पिओ जळाली

By Admin | Updated: February 10, 2017 02:58 IST2017-02-10T02:58:33+5:302017-02-10T02:58:33+5:30

देवदर्शनाला निघालेल्या नाशिकच्या भक्तांची स्कॉर्पिओ गाडी (एमएच १५ सीटी ९०४९) गुरुवारी (दि ९) पहाटे आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली

Scorpio of devotees burnt in Baramat | बारामतीत भाविकांची स्कॉर्पिओ जळाली

बारामतीत भाविकांची स्कॉर्पिओ जळाली

बारामती : देवदर्शनाला निघालेल्या नाशिकच्या भक्तांची स्कॉर्पिओ गाडी (एमएच १५ सीटी ९०४९) गुरुवारी (दि ९) पहाटे आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली. देवदर्शनाला निघालेल्या भक्तांनी बारामती शहरात मुक्काम केला होता. यादरम्यान अज्ञात व्यक्तीने फेकलेल्या सिगारेटच्या पेटत्या थोटकामुळे आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेत गाडी ९० टक्के जळून खाक झाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मच्छींद्र बाबूराव माळी (वय २८, रा. अशोकनगर, सातपूर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. ते चौघा मित्रांसह गाणगापूर येथे देवाला निघाले होते. रात्री ९ वाजता नाशिक येथून निघाल्यानंतर रात्री १२ वाजता बारामती शहरात पोहोचले.
रात्री त्यांनी शहरातील बालाजी मंदिरात येथील मित्र सुनील माणिक मोदी (रा. गांधी चौक, बारामती) यांच्या समवेत गाडीतील इतर प्रवाशांसह मुक्काम केला.
या वेळी त्यांनी गाडी रस्त्यालगत मंदिराबाहेर लावली. पहाटे साडेचार
ते पाचच्या दरम्यान त्यांना गाडीचा टायर फुटल्याचा आवाज आला. त्यामुळे ते मंदिराबाहेर आले. या वेळी त्यांच्या गाडीने पेट घेतल्याचे
त्यांनी पाहिले. अग्निशामक वाहनाच्या मदतीने त्यांनी पेटलेली गाडी विझवली. मात्र, या घटनेत गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली.
अज्ञात व्यक्तीने फेकलेल्या सिगारेटच्या पेटत्या थोटकामुळे आग लागल्याचा संशय माळी यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी अकस्मात जळीत म्हणून नोंद केली आहे. या घटनेत गाडी लावलेल्या ठिकाणी बाजूच्या पडीक घरांची लाकडे जळून खाक झाली आहेत.
गाडीचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर पडीक
घरांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. अधिक तपास पोलीस नाईक विजय जगताप करीत आहेत. दरम्यान, वेळीच आग आटोक्यात आल्याने अनर्थ टळला.
सायंकाळी के्रनच्या मदतीने गाडी उचलून ट्रकमध्ये नेण्यात आली. बारामती शहरात आग लागून गाडी जळाल्याची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. जळालेल्या गाडीबाबत विविध चर्चेला शहरात उधाण आले होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Scorpio of devotees burnt in Baramat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.