सयाजीरावांचा पत्रप्रपंच अभ्यासक्रमात येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 02:28 IST2019-03-11T02:28:13+5:302019-03-11T02:28:24+5:30
बारा खंड प्रकाशित : जगभरातील जाणकारांशी पत्रव्यवहार

सयाजीरावांचा पत्रप्रपंच अभ्यासक्रमात येणार
- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : महाराजा सयाजीराव गायकवाड हे पुरोगामी दृष्टीचे संस्थानिक, कलासक्त राजे आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांच्या समाजाभिमुख कार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सयाजीरावांचा जीवनप्रवास अधोरेखित करणारे ५० खंडांवर चरित्र साधन समितीचे काम सुरू आहे. त्यापैकी १२ खंड बडोदा येथील साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात आले असून, उर्वरित १३ खंडही प्रकाशित होत आहे. ११ मार्च रोजी सयाजीरावांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचा पत्रप्रपंच आणि भाषणे अभ्यासक्रमात समाविष्ट व्हावीत, यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय चरित्र साधन समितीने घेतला आहे. यासंदर्भात, विनोद तावडे यांच्याशी प्राथमिक स्तरावरील चर्चा झाली असून, पाठ्यपुस्तक मंडळाकडे लवकरच हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून कायमच जनकल्याण आणि लोकसेवेचा ध्यास घेतला. मोफत आणि सक्तीचे शिक्षण, ग्रंथालयांना प्रोत्साहन, कलांना राजाश्रय, जनतेचा सर्वांगीण विकास या मुद्द्यांवर त्यांनी कायम लक्ष केंद्रित केले. इतिहास, राजकारण, कला अशा विविधांगी विषयांवर त्यांनी जगभरातील अनेक जाणकारांशी पत्रव्यवहार केला. विविध परिषदांमधील भाषणांमधून त्यांनी आपल्या दूरदृष्टीचे दर्शन घडवले. शालेय अभ्यासक्रमात इयत्ता चौथी आणि नववीच्या पाठ्यपुस्तकामध्ये, तसेच पुणे, नांदेड, अमरावती विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमामध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेण्यात आला आहे; मात्र हा आढावा चरित्रात्मक स्वरूपाचा आहे. सयाजीरावांची भाषणे आणि पत्रव्यवहार विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरणारा आहे. त्यादृष्टीने हा पत्रप्रपंच अभ्यासक्रमात समाविष्ट होणे गरजेचे असल्याचे मत महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधन समितीचे सचिव बाबा भांड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
सयाजीराव थोडक्यात समजून घेता येणार
महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जीवनप्रवास आणि कर्तृत्व २५ खंडांमधून शब्दबद्ध करण्याचे शिवधनुष्य चरित्र साधन समितीने पेलले आहे. सामान्यांना सयाजीराव थोडक्यात समजून घेता यावेत, यासाठी ३२ पानांची छोटी पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
ही पुस्तिका हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय पुढील वर्षभरामध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि कोल्हापूर अशा चार ठिकाणी दोन दिवसीय परिसंवादांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मालेगावपासून ६ किलोमीटर अंतरावर असलेले कवळाणे हे महाराज सयाजीरावांचे जन्मगाव. ११ मार्च रोजी सयाजीरावांची १५६ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त शासकीय समितीतर्फे पाच पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे. यामध्ये युगद्रष्टा, महाराष्ट्राचे शिल्पकार सयाजीराव अशा पुस्तकांचा समावेश आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये २५ खंडांचे प्रकाशन चरित्र साधन समितीतर्फे केले जाणार आहे.
सयाजीराव यांच्या नावे शासनामार्फत ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. बडोद्याच्या साहित्य संमेलनात प्रकाशित झालेल्या १२ खंडांचा हिंदीमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. यामध्ये भाषण, गौरवगाथा, पत्रव्यवहार, स्वातंत्र्ययोद्ध्यांचे पाठीराखे, प्रज्ञावंत सयाजीराव आदी खंडांचा समावेश आहे. डॉ. सुनीलकुमार लवाटे यांनी हिंदी अनुवादाचे काम पूर्णत्वास नेल्याचे भांड यांनी सांगितले.