संत साहित्य हे जीवन जगण्याची कला शिकविते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST2021-07-23T04:09:20+5:302021-07-23T04:09:20+5:30

माजी राज्यपाल न्या. विष्णू कोकजे : ‘एमआयटी डब्ल्यूपीयू’त भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मातृभाषेतील शिक्षण ...

Sant Sahitya teaches the art of living life | संत साहित्य हे जीवन जगण्याची कला शिकविते

संत साहित्य हे जीवन जगण्याची कला शिकविते

माजी राज्यपाल न्या. विष्णू कोकजे : ‘एमआयटी डब्ल्यूपीयू’त भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “मातृभाषेतील शिक्षण हळुहळु बंद होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संत साहित्याची ओळखच नाही. आजच्या शिक्षण पद्धतीत भौतिकतेचा पगडा अधिक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढून नैराश्य आले आहे. अशावेळेस मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची कला शिकवायची असेल तर संत साहित्यांचा खजिना त्यांना द्यावा,” असे विचार विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल न्या. विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती, आळंदी, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या चार दिवसीय ‘भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषदे’चे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड हे अध्यक्षस्थानी होते. ह.भ.प. किसन महाराज साखरे हे पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व परिषदेचे मुख्य निमंत्रक राहुल विश्‍वनाथ कराड, कुलगुरू डॉ. एन. टी. राव, परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बापूसाहेब मोरे, कार्याध्यक्ष ह.भ.प. डॉ. रविदास महाराज शिरसाठ, समन्वयक डॉ. संजय उपाध्ये आणि प्रा. डॉ. मिलिंद पांडे हे उपस्थित होते.

न्या. विष्णू कोकजे म्हणाले, “उच्च शिक्षणावर विचार करावा लागणे हेच सर्वात महत्वाचे आहे. आजच्या काळात संत साहित्यांच्या ज्ञानाची खूप मोठी गरज आहे. चांगले नागरिक घडविणे आणि त्यांच्यात भारतीय संस्कार रुजविणे हे संत साहित्याचे कार्य आहे. संस्काराशिवाय शिक्षण देणे हे महाभयंकर कार्य आहे. विद्या विनयेन शोभते हे सुभाषित आहे. पण त्यात आध्यात्मिक ज्ञान असेल तर जीवन सुखमय होईल.”

प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, “जगात प्रसिद्ध वेदशास्त्रात ज्ञान आणि विज्ञानाचे सखोल ज्ञान आहे. आजची पिढी पाश्‍चात्य संस्कृतीमुळे वेगळ्या मार्गावर चाललेली आहे. त्यामुळे त्यांचे स्वत्व, स्वाभिमान आणि स्वधर्म गळून पडला आहे. त्याला जागृत करण्याचे कार्य संत साहित्यातून होईल.” राहुल कराड म्हणाले,“स्वातंत्र्यानंतर देशात जी प्रगती झाली ती खूप छान आहे. पण शिक्षण क्षेत्रात हवी तेवढी प्रगती झालेली नाही. त्यासाठी आपल्या शिक्षणात संत साहित्यांचा समावेश करून त्यावर संशोधन करणे गरजेचे आहे. पाश्चिमात्य जगातले सगळेच चांगले असल्याच्या मानसिकतेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढणे गरजचे आहे.” प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Sant Sahitya teaches the art of living life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.