संकल्प’ आणि ‘मांजा’ ठरले सर्वोत्कृष्ट लघुपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:27 IST2021-01-13T04:27:57+5:302021-01-13T04:27:57+5:30
पुणे : माझी वसुंधरा अभियानातंर्गत ‘राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म महोत्सवा’त हरिश कोंडे यांच्या ‘संकल्प’ आणि पी. के. भांडवलकर यांच्या ...

संकल्प’ आणि ‘मांजा’ ठरले सर्वोत्कृष्ट लघुपट
पुणे : माझी वसुंधरा अभियानातंर्गत ‘राज्यस्तरीय पर्यावरण शॉर्टफिल्म महोत्सवा’त हरिश कोंडे यांच्या ‘संकल्प’ आणि पी. के. भांडवलकर यांच्या ‘मांजा’ या लघुपटांनी सर्वोत्कृष्ट लघुपटांचा मान मिळविला. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक अक्षय वासकर यांच्या '' अँडिकशन'' व सर्वोत्कृष्ट माहितीपटाचे पारितोषिक सुनील डांगे यांच्या ‘अवनी’ या माहितीपटाने पटकावले.
माय अर्थ फाउंडेशन, ध्यास फाउंडेशन आदी संस्थांच्या वतीने आयोजित या महोत्सवाचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते झाले. दिग्दर्शक नितीन सुपेकर, सुरेश कोते, वीरेंद्र चित्राव, अमित वाडेकर, नितीन शिंदे, दत्तात्रेय देवळे यावेळी उपस्थित होते.
या महोत्सवात हितेंद्र सोमाणी यांच्या ‘सुरक्षित भविष्य’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनचे पारितोषिक तर सर्वोत्कृष्ट संवादाचे पारितोषिक जितेंद्र घाडगे यांच्या ‘जीवाश्म’ तर सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचे पारितोषिक सचिन मंबगाई यांच्या ‘हिरवी आशा’ यांना देण्यात आले.
मेघराज राजेभोसले म्हणाले, पर्यावरण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पर्यावरणाचे संतुलन आपण राखायला हवे. एखाद्या विषयाला वाहिलेल्या लघुपट महोत्सवाला प्रोत्साहित करायला हवे.
वीरेंद्र चित्राव म्हणाले, पर्यावरण रक्षणाकरिता पाऊल उचलण्यासाठी चित्रपट महोत्सव हे प्रभावी संस्कार माध्यम आहे. कारण सर्वात जास्त पगडा दृकश्राव्य माध्यमाचा असतो. पर्यावरण रक्षणाची चळवळ यातून उभी राहू शकेल. पर्यावरण रक्षणाची क्रांती ही युवा पिढीच करू शकते. पर्यावरण संस्थांनी एकत्र येऊन पुढील 25 वर्षांचे धोरण तयार करावे.
.....