संयमाचा बांध फुटतोय
By Admin | Updated: November 14, 2016 07:02 IST2016-11-14T07:02:12+5:302016-11-14T07:02:12+5:30
सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टाच्या दारात उभा आहे, दुपारचे बारा वाजून गेले तरीही पोस्ट आॅफिस उघडले नाही. साहेब! घरी जेवण करायला सुट्टे पैसे नाहीत,

संयमाचा बांध फुटतोय
पुणे : सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टाच्या दारात उभा आहे, दुपारचे बारा वाजून गेले तरीही पोस्ट आॅफिस उघडले नाही. साहेब! घरी जेवण करायला सुट्टे पैसे नाहीत, आज तरी सुट्टे पैसे द्या ना, भाजीपाला घेण्यासाठी सुट्टे पैसे नाहीत; कसेबसे चार दिवस काढले, पाचवा दिवस उगवला तरीही बँका सुरळीतपणे सुरू नाहीत. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी फक्त सर्वसामान्यांना रांगा लावाव्या लागत आहेत, आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा; आता आमचा संयमाचा बांध फुटू लागला आहे, अशा भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
केंद्र शासनाच्या नोटा बंदच्या निर्णयाचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना होत असून बँक, पोस्ट आॅफिसच्या दारात तासन्तास उभे राहून सुट्टे पैसे मिळवण्यासाठी पहाटेपासून यावे लागत आहे. नागरिकांकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे भाजीपाला, दूध खरेदी करण्यापासून साधा वडापाव खाण्यासही अडचणी येत आहेत. शहरातील काही बँका, पोस्ट आॅफिस पाचवा दिवस उगवला तरीही अद्याप सुरळीत सुरू झालेल्या नाहीत. निवडक बँकांचे एटीएम मशिन सुरू झाल्या तरी त्यासमोर लांबचलांब रांगा दिसून आल्या. एटीएममधून एका व्यक्तीला केवळ दोन हजार रुपपांपर्यंत रक्कम काढता येत होते. काही तासांतच ही रक्कम संपत असल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून आले.
नोटा बंदच्या निर्णयामुळे शनिवार, रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला तरी बँकांपर्यंत पैसे न पोहोचल्यामुळे शहरातील अनेक बँका सुरूच झाल्या नाहीत. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही बँका उशिरा सुरू झाल्या तर काही बँका पैसे संपल्याने दुपारी ३ वाजताच बंद झाल्या. भांडारकर रस्त्यासह घोले रस्त्यावरील काही बँकांचे एटीएम केंद्र सुरू होते. बाजीराव रस्त्यावरील एटीएम बंद असल्याने नागरिक एटीएम सुरू होण्याची प्रतिक्षा करताना दिसून आले. तासंतास रांगेत उभे राहून हातात १०० रुपयांच्या २० नोटा पडल्याचे पाहून काही नागरिकांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता.
बँका व पोस्ट आॅफिसमधून पैसे बदलून मिळतील, असे स्पष्ट केले असताना काही नागरिकांना मर्यादित पैसे दिले जात होते.पैसे बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांना काही बँकांकडून केवळ ५०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात होती. त्यामुळे ही रक्कम संपल्यानंतर पुन्हा एकदा रांगेत उभे रहावे लागणार,या चिंतेने घरी जात होते. (प्रतिनिधी)