अभियंत्याची नोकरी सोडून किशोर झाला विक्रीकर निरीक्षक
By Admin | Updated: March 10, 2017 04:43 IST2017-03-10T04:43:52+5:302017-03-10T04:43:52+5:30
तालुक्यातील केंदूर येथील शेतकरी कुटुंबातील किशोर प्रकाश शेटे याने स्पर्धा परीक्षेत विक्रीकर निरीक्षक म्हणून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. शालेय जीवनातच

अभियंत्याची नोकरी सोडून किशोर झाला विक्रीकर निरीक्षक
शिरूर : तालुक्यातील केंदूर येथील शेतकरी कुटुंबातील किशोर प्रकाश शेटे याने स्पर्धा परीक्षेत विक्रीकर निरीक्षक म्हणून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेचे स्वप्न उराशी बाळगले आणि जिद्द ठेवली म्हणून स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया किशोरने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
केंदूर येथील प्रकाश शेटे या नववीत शिक्षण घेतलेल्या शेतकऱ्याचा किशोर हा मुलगा. चुलते रामभाऊ शेटे हे जि. प. शाखा अभियंता. किशोरचे दहावीपर्यंतचे शिक्षण केंदूर येथे झाले. जातेगाव बुद्रूक येथे अकरावी, बारावी केल्यानंतर किशोरने इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेश्न इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. इंजिनिअरिंग पूर्ण केले. लगेच नोकरीही लागली. नोकरी करतानाच तो स्पर्धा परीक्षेची तयारीही करू लागला. एकाच वेळी नोकरी व अभ्यास यांची सांगड बसेना म्हणून कुटुंबाची परवानगी घेऊन नोकरी सोडली. स्पर्धा परीक्षेसाठी पूर्ण वेळ दिला. पहिल्या प्रयत्नात १५ गुणांनी तर दुसऱ्या प्रयत्नात एका गुणाने यशाला हुलकावणी दिली. मात्र, खचलो नाही. आई, वडील, चुलता, चुलती यांनी प्रोत्साहन दिल्याचे किशोरने सांगितले. स्पर्धा परीक्षेचा क्लास वगैरे काही नसताना स्वबळावर किशोर अभ्यास करत राहिला. रात्री दहाला अभ्यासाला बसल्यावर सकाळी सात वाजेपर्यंत सलग अभ्यास करायचो. दोन वेळा हुलकावणी दिली म्हणून तिसऱ्यांदा यश मिळणारच याची खात्री होती. मात्र, प्रथम येईन याची कल्पना नव्हती, असे किशोरने सांगितले. (वार्ताहर)
उपजिल्हाधिकारी बनायचंय
किशोर प्राथमिक शाळेत (केंदूर) असताना गावातीलच भारतीय प्रशासकीय सेवेत असणारे प्रशांत गाडेकर यांचे शाळेत गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी गाडेकर यांनी केलेल्या मार्गदर्शनातून प्रेरणा मिळाली आणि तेव्हाच स्पर्धा परीक्षा द्यायची, हे स्वप्न उराशी बाळगल्याचे किशोरने सांगितले. किशोरचे उपजिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न असून,तो पुढील महिन्यात परीक्षा देणार आहे.
ओपन कॅटॅगरीत प्रथम येण्याचा मान मिळाला. एसटीआयच्या केवळ ६८ जागा व यातच ओपनच्या १४ जागा होत्या. लाखांत विद्यार्थ्यांची संख्या. यातूनच प्रथम क्रमांक आनंद देणारा आहे.
- किशोर शेटे