टाटा मोटर्समध्ये १९ महिन्यांनंतर वेतनवाढ करार

By Admin | Updated: March 29, 2017 02:23 IST2017-03-29T02:23:54+5:302017-03-29T02:23:54+5:30

टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यातील वेतनवाढ करार मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखेर मार्गी

Salary Increase Agreement in 19 months after Tata Motors | टाटा मोटर्समध्ये १९ महिन्यांनंतर वेतनवाढ करार

टाटा मोटर्समध्ये १९ महिन्यांनंतर वेतनवाढ करार

पिंपरी : येथील टाटा मोटर्स व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन यांच्यातील वेतनवाढ करार मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखेर मार्गी लागला. त्रैवार्षिक पद्धतीने हा करार झाला असून, कामगारांचा पाडवा अधिकच गोड झाला. कंपनीतील कामगारांनी भंडाऱ्याची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. हा वेतनवाढ करार १९ महिने प्रलंबित होता.
१ सप्टेंबर २०१५ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीकरिता ८६०० प्रत्यक्ष वाढ ही तीन वर्षाच्या टप्प्याटप्प्याने (७२ टक्के, १५ टक्के व १३ टक्के अशी) विभागून तसेच ८७०० रुपये अप्रत्यक्ष म्हणजे एकूण रुपये १७ हजार ३०० एवढ्या रकमेचा हा करार झाला. या पगारवाढी व्यतिरिक्त कंपनीने कंपनीच्या सेवेत असताना एखादा कामगार मृत पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटी बाबत, २५ वर्षसेवा काल पूर्ण झाल्यावर देण्यात येणारे घड्याळ आता कामगाराच्या पती अथवा पत्नीसही देण्यात येणार आहे. या वाढीबरोबरच कामगारांना देण्यात येणारया इतरही सेवा सवलतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. ब्लॉक क्लोजरच्या दिवसांमध्येही सहा दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
क्वालिटी विभागाचे कार्यकारी संचालक व टाटा मोटर्सच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सदस्य सतिश बोरवणकर यांनी कराराबाबतची युनियनबरोबर चर्चा करून करार मार्गी लावला. कामगार व युनियनसोबत कंपनीचे संबंध नेहमीच सौहार्दपूर्ण राहिले असल्याचे बोरवणकर त्यांनी यावेळी नमूद केले. कामगारांनी जवळजवळ १९ महिने शांततेच्या मार्गावर राहिल्याबद्दल कौतुक केले व युनियनने चांगल्या मार्गाचा अवलंब करून कामगारांना जास्तीत जास्त फायदा करून दिल्याचा उल्लेख केला. टाटा संस्कृती आपण सर्वांनीच अशाच प्रकारे जपली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी व्यवस्थापनाकडून प्लांट हेड संगमनाथ दिग्गे, एचआर हेड संजय वर्मा, डेव्हलपमेंट-ईआरसीचे जनरल मॅनेजर नंदगोपाल वैद्य, शेअर्ड सर्व्हिसेचे हेड रविंद्र पेठे, रमेश अय्यर, पद्माकर कुलकर्णी, विलास गोडसे आदी उपस्थित होते. तर युनियनच्यावतीने अध्यक्ष समीर धुमाळ, कार्याध्यक्ष संजय काळे, सरचिटणीस सुरेश जासूद, खजिनदार यशवंत चव्हाण, उपाध्यक्ष कमलाकर ढमढेरे, सहसचिव रमेश गारडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

कामगार लढ्याला आले यश
टाटा मोटर्स कंपनीचा वेतनवाढ करार १ सप्टेंबर २०१५ पासून रखडला होता. कंपनी व्यवस्थापन आणि टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनमध्ये करारासंदर्भात अनेक बैठका फिसकटल्या होत्या. वेतनवाढ करार तीन वर्षांसाठीचा असावा, अशी युनियनची प्रमुख मागणी होती. बैठका घेऊनही तोडगा निघत नसल्याने कामगारांनी १७ मार्चला कंपनीच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. तसेच जेवणावरही बहिष्कार घातला होता.
दरम्यान, २० मार्चला टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा आणि नवनिर्वाचित अध्यक्ष एन. चंद्र्रशेखरन यांनी टाटा मोटर्सच्या पिंपरी प्रकल्पातील कामगारांची भेट घेत त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यासह प्रलंबित वेतनकरार लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. यानंतर काही अवघ्या आठवड्याभरातच प्रश्न मार्गी लागल्याने कामगारवर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Salary Increase Agreement in 19 months after Tata Motors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.