साहित्य संमेलने साहित्यिकांची जीवनवाहिनी
By Admin | Updated: March 16, 2017 01:59 IST2017-03-16T01:59:59+5:302017-03-16T01:59:59+5:30
साहित्यिक, कलाकार हा समाजातील गुणदोष दाखवीत असताना त्याला पाठबळाची आवश्यकता असते. साहित्यामधून समाजाला दिशा मिळते.

साहित्य संमेलने साहित्यिकांची जीवनवाहिनी
बारामती : साहित्यिक, कलाकार हा समाजातील गुणदोष दाखवीत असताना त्याला पाठबळाची आवश्यकता असते. साहित्यामधून समाजाला दिशा मिळते. तसेच दर्जेदार साहित्य निर्माण करणाऱ्या साहित्यिकांसाठी साहित्य संमेलने जीवनवाहिनीप्रमाणे असतात, असे मत अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले.
बारामती येथे १२वे राज्यस्तरीय मराठी साहित्यिक व कलावंत संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, की साहित्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. साहित्यामुळे संस्कृती कळते. सर्व जगात मराठी साहित्याचा गौरव होत असताना पाश्चिमात्य संस्कृती, साहित्याचा होत असलेला अतिरेक थांबला पाहिजे. साहित्यिकांना राजाश्रय मिळाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मराठी साहित्य हे आदर्शवादी व गौरवास्पद आहे. त्याचा आदर्श प्रत्येक साहित्यकाने घेण्याचे आवाहन आमदार रामहरी रूपनवर यांनी केले.
साहित्य संमेलने ही काळाची गरज असून साहित्यिक, कलावंत यांना ऊर्जा देण्यासाठीच गेल्या सहा वर्षांपासून हा लढा चालू आहे. शासन मदत करो अथवा न करो; परंतु साहित्यिकांना संमेलनाच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे प्रास्ताविकामध्ये अध्यक्ष बी. डी. गायकवाड यांनी सांगितले.
या प्रसंगी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी १० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. अनिल सातव यांनी आभार मानले.
या वेळी आमदार अॅड. रामहरी रूपनवर, किशोर शहा, नेहा शहा, संमेलनाध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील, कविसंमेलनाचे अध्यक्ष लोककवी मदन देगावकर, स्वागताध्यक्षा नीता बारवकर, रानकवी जगदीप व बी. डी. गायकवाड, अनिल सातव, सचिव राधिका अनपट, नाजनील शेख, उमेश शिंदे, प्रदीप कोथमिरे यांच्यासह अनेक कलावंत उपस्थित होते.