तांदळीत तीन पत्ती जुगारअड्ड्यावर छापा
By Admin | Updated: August 13, 2015 04:33 IST2015-08-13T04:33:38+5:302015-08-13T04:33:38+5:30
शिरूर तालुक्यातील तांदळी येथील खोरेवस्तीवर तीन पानी जुगारअड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी बारामती विशेष पथक विभागाने छापा टाकला. आलिशान गाड्या, रोख रकमेसह

तांदळीत तीन पत्ती जुगारअड्ड्यावर छापा
मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील तांदळी येथील खोरेवस्तीवर तीन पानी जुगारअड्ड्यावर मंगळवारी सायंकाळी बारामती विशेष पथक विभागाने छापा टाकला. आलिशान गाड्या, रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, फक्त एकास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले, बाकीचे जुगारी पसार झाले.
अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्या पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. घोडनदीजवळ कुबाभळीच्या झुडपात एका पत्र्याच्या शेडमध्ये हा जुगार सुरू होता. बंडू शेलार (मांडवगण फराटा ) व पंडित खोरे (तांदळी) हे दोघे भागीदारीत अड्डा चालवत होते. या ठिकाणी पोलिसांना १४ जण जुगार खेळताना आढळले.
पोलिसांची चाहूल लागताच ते व जुगार चालवणारे उसाच्या शेतात पसार झाले. पोलिसांनी पाठलाग केला. यातील सुजित रमेश सारसकर (वय-४०, रा.सिद्धार्थनगर ,अहमदनगर) याला पकडण्यात यश आले.
याबाबत विशेष पथकातील हेडकॉन्स्टेबल संजय कोलते यांनी फिर्याद दिली आहे. या कारवाईमध्ये आलिशान गाड्यांसह रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. ६५लाख ६७ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. छाप्याच्यावेळी या आलिशान गाड्यांमध्ये लाखोंची रोख रक्कम आढळून आली आहे. यामध्ये टाटा सफारी, स्विप्ट, डस्टर, टोयाटो अशा आलिशान गाड्या आहेत.
कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांच्या विशेष पथकातील संजय कोलते , एस.डी भोई, पी.आर.टापसे, जी.बी.पाटील, एम .एन .गायकवाड, जे.एस.शेळके, एस.जी औटी, व्ही.पी.मोरे, ए.जे.चव्हाण, जमादार ए.के. रासकर यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)