आरटीई २५ टक्के प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:00+5:302021-06-09T04:13:00+5:30
बारामती : सन २०२१-२२ च्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली ...

आरटीई २५ टक्के प्रवेश
बारामती : सन २०२१-२२ च्या आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ११ जूनपासुन याअंतर्गत संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी ही माहिती दिली.
त्यानुसार, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत (लॉटरी) ७ एप्रिल २०२१ रोजी काढण्यात आली आहे. आरटीई अंतर्गत निवड यादीत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत जाऊन विहित मुदतीत प्रवेश निश्चित करावयाचा आहे.
सन २०२१-२२ या वषार्ची आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दिनांक ११ जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेवून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येईल. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाकरीता २० दिवसांचा कालावधी देण्यात यावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पालकांनी शाळेत गर्दी करु नये. शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर प्राप्त यादीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा दिनांक आरटीई पोर्टलवर द्यावा. लॉटरी लागलेल्या बालकांच्या पालकांनी मुळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन शाळेत जाऊन आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा. बरेच पालक शाळेत प्रवेश मिळावा यासाठी आरटीई प्रवेश फॉर्म भरताना चुकीचे अंतर दाखवतात. त्यामुळे रहिवासी पत्याचा पुरावा इ. कागदपत्रांवरुन शाळा व निवासी पत्याच्या अंतराची पडताळणी करावी. निवड यादीतील बालकांबाबत चुकीचे अंतर दाखविल्याचे निदर्शनास आल्यास शाळेने तात्पुरता प्रवेश देवू नये. अशा पालकांना तालुकास्तरीय समिती / शिक्षणाधिकारी यांचेकडे अर्ज करण्याची सूचना द्यावी.
पडताळणी समितीने आलेले अर्ज व तक्रारीची शहानिशा करुन प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश सुरु होण्याआधी प्रवेश द्यावा किंवा देवू नये याबाबतचा आदेश शाळेला द्यावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन या कारणांमुळे जे पालक प्रत्यक्षरित्या शाळेत प्रवेशासाठी येवू शकत नाही अशा बालकांच्या पालकांनी विहित मुदतीत दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे, व्हॉट्सअॅपद्वारे शाळेत संपर्क करुन प्रवेशाची कार्यवाही पूर्ण करावी. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश घेण्याचा कालावधी संपल्यानंतर शाळांमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्राधान्य देण्यात येईल. त्याबाबतच्या सविस्तर सूचना आरटीई पोर्टल वर दिल्या जाणार असल्याचे जगताप यांनी कळविले आहे.
————————————————