पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) काेणत्याही पक्षाबराेबर युती करणार नाही, असे स्पष्ट करत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कार्यकर्त्यांना पक्षाचे संघटन वाढवण्याचे आवाहन केले आहे.
‘रासप’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी पुण्यात झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जानकर म्हणाले, भाजपला सत्तेत आणण्यासाठी आपण मदत केली. आता त्यांना सत्तेतून घालविण्यासाठी प्रयत्न करू. आगामी निवडणुकीसाठी आपण कोणाबरोबरही युती करणार नाही. प्रत्येक प्रभाग, गट-गण या ठिकाणी आपला उमेदवार उभा करायचा आहे. त्यामुळे केवळ समाजमाध्यमांवर फाेटाे टाकण्यापुरते काम करू नका. महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक बूथवर आपल्या पक्षाचा एक कार्यकर्ता असला पाहिजे, असे नियाेजन करा.
पुढील दाेन महिने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर द्या. जाे काम करणार नाही, त्याला पदमुक्त केले जाईल. पक्ष साेडून जाणाऱ्यांचा विचार करू नका, जे भाजपमध्ये गेले त्यांची अवस्था आज काय झाली हे तुम्ही पाहत आहात. उठ म्हटले की उठ आणि बस म्हटले की बस, असे त्यांचे झाले आहे. भाजपमध्ये अनेक जण प्रवेश करीत असल्याने त्यांचे जुने कार्यकर्ते हे आपल्याकडे येऊ शकतात. याचा विचार करा. आपल्या पक्षाला चार राज्यांत स्थान आहे. आता मध्यप्रदेशमध्ये संघटन बांधणी सुरू आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे, असेही जानकर म्हणाले.