अपघातप्रकरणी ४९ लाखांची भरपाई
By Admin | Updated: November 17, 2016 03:26 IST2016-11-17T03:26:33+5:302016-11-17T03:26:33+5:30
ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मेंटेनन्स मॅनेजरचा मृत्यू झाल्याप्रकरणी महालोक अदालतमध्ये तडजोडीअंती ४९ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

अपघातप्रकरणी ४९ लाखांची भरपाई
पुणे : ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मेंटेनन्स मॅनेजरचा मृत्यू झाल्याप्रकरणी महालोक अदालतमध्ये तडजोडीअंती ४९ लाख ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. या महालोक अदालतमध्ये मोटार अपघात न्यायप्राधिकरणाच्या दाव्यात देण्यात आलेली ही सर्वात मोठी नुकसानभरपाई ठरली आहे. विशेष न्यायाधीश मंगला धोटे, अॅड. मनीषा ओस्तवाल आणि अॅड. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या पॅनलने हा दावा निकाली काढला आहे.
सी. पी. विजयन नायर (वय ४९) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. नायर हे २ एप्रिल २०१५मध्ये दुचाकीवरून कामाला चालले होते. त्या वेळी चिंचवड, शाहूनगर येथे पाठीमागून आलेल्या ट्रकने नायर यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या वेळी झालेल्या अपघातात नायर यांचा जागीच मृत्यू झाला. नायर यांच्या पश्चात पत्नी बिंदू, दोन लहान मुली असा परिवार आहे. नायर एक्स.ए.एल.टूल इंडिया या कंपनीत मेंटेनन्स मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांना दरमहा ४५ हजार ४७२ पगार होता.
या पार्श्वभूमीवर ७० लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी बिंदू यांनी अॅड. अनिल पाटणी आणि अॅड. आशिष पाटणी यांच्यामार्फत त्या ट्रकचे मालक आणि विमा कंपनी असलेल्या श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनी, जयपूरच्या विरोधात येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. (प्रतिनिधी)