‘क्युनेट’द्वारे ४० लाख रुपयांचा गंडा
By Admin | Updated: January 12, 2017 03:25 IST2017-01-12T03:25:41+5:302017-01-12T03:25:41+5:30
‘क्युनेट’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करून देण्याचे आमिष दाखवून १० पुणेकरांना

‘क्युनेट’द्वारे ४० लाख रुपयांचा गंडा
पुणे : ‘क्युनेट’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई करून देण्याचे आमिष दाखवून १० पुणेकरांना ४० लाखांना गंडवण्यात आले असून, देशभरातील तब्बल २०० जणांना फसवण्यात आले आहे. या रॅकेटमधील चौघांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
टिनू रोशनलाल वाधवानी (वय २४, रा. लखनौ, उत्तर प्रदेश), सिद्धार्थ अरुण हरले (वय ३०, रा. जुनी सांगवी), विजय काशिनाथ भोई (वय २७, रा. मळकर रोड, आळंदी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदर मयूरी खानवाले, स्वप्निल जाधव व विनोद पचराला हे आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी महेश उत्तम माने (वय २८, रा. नवी सांगवी) यांनी तक्रार दिली आहे. यातील मयूरी व टिनू हे मुख्य आरोपी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागरिकांना स्वत:चा उद्योग करण्यास उद्युक्त करून पैसे भरायला लावत. पैसे भरल्यावर मल्टीलेवल मार्केटिंग पद्धतीने आणखी सभासद करायला सांगितले जात. या पैशांमधून कमिशन देण्याचे आमिषही दाखवण्यात येई. फिर्यादी माने आणि आरोपी हरले हे मित्र आहेत. हरले याने मानेला फोन करून व्यवसायासाठी दोन लोकांची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. मोठ्या व्यवसायामधून तब्बल पाच कोटींचे कमिशन मिळेल, असे सांगितले. व्यवसायाची माहिती न देता त्यांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन अन्य आरोपींची ओळख भागीदार म्हणून करून दिली.
त्यांना व्यवसायासाठी चार लाख भरायला सांगण्यात आले. माने यांनी कर्ज काढून चार लाख भरले. त्यानंतर क्युनेट नावाच्या व्यवसायाद्वारे विविध वस्तू घेऊन त्याची संकेतस्थळावरून विक्री केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यासाठी एक लॉगिन आयडी आणि पासवर्डही देण्यात आला. त्यांना अन्य सभासद तयार करण्यास सांगून सभासदांकडून आलेले पैसे कंपनीच्या खात्यावर भरायला लावले.
माने यांना युरोपात नेल्याचा खर्च त्यांच्या रकमेमधून करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. दरम्यान अशा प्रकारे फसवणूक केली जात असल्याचे त्यांना समजले. त्यांनी वाधवानीकडे सर्वांचे पैसे परत करण्याची मागणी केली. त्याने पैसे परत देण्यास नकार दिला. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. सायबर सेलच्या पोलिसांनी चौघांना अटक केली. (प्रतिनिधी)
सिस्टीम हॅक करून वापरले ११ वर्षांचे इंटरनेट
४एका कंपनीची सिस्टीम हॅक करून बेकायदेशीरपणे तब्बल ११ वर्षांचे इंटरनेट एकाच वर्षात वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर सेलच्या पोलिसांनी जाहीद मंहमद हनिफ शेख (वय २५, रा. भवानी पेठ) आणि समीर ऊर्फ समशेर इब्राहिम पठाण (वय वय ३०, रा. गंज पेठ) या दोघांना अटक केली आहे.
४याप्रकरणी इंटर मेडिया केबल कम्युनिकेशन कंपनीचे शामसुंदर पप्पू (वय ५२, रा. नानकनगर, कोंढवा खुर्द) यांनी तक्रार दिली आहे. पठाण याच कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून शेख याने कंपनीची सिस्टीम हॅक केली. विविध प्रॉक्सी मॅक तयार केले. डिसेंबर १५ ते डिसेंबर १६ या कालावधीत त्यांनी कंपनीचे इंटरनेट चोरुन वायफाय रुम तयार केली होती. नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांना इंटरनेटचा वापर करू दिला जात होता.