'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला १० हजार कापले जाणार; आयुक्तांनी सुनावली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 21:06 IST2020-07-26T21:05:56+5:302020-07-26T21:06:12+5:30
कामातील हलगर्जीपणा भोवला; पुढील २ वर्षे पगारकपात होणार

'त्या' पोलीस अधिकाऱ्याच्या पगारातून दर महिन्याला १० हजार कापले जाणार; आयुक्तांनी सुनावली शिक्षा
पुणे : विरारमधील दोन भावांच्या मृत्यू प्रकरणात कामात हलगर्जीपणा केल्याने विरार पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सध्या येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस इस्माईल शेख यांना पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी मासिक पगारातून दरमहा १० हजार रुपये इतकी रक्कम २ वर्षे कपात करण्याची शिक्षा सुनावली आहे.
विरारमध्ये ही घटना ८ नोव्हेंबर २०१७ मध्ये घडली होती. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख व इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात सीआयडीने युनूस शेख यांना मार्च २०१८ मध्ये अटक केली होती. या प्रकरणात अपर पोलीस अधीक्षक रायगड यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी चौकशी केल्यानंतर आता त्यांची पुण्यात नियुक्ती झाली असल्याने विभागीय चौकशीचा अहवाल पुण्यात पाठविण्यात आला होता.
याबाबतची माहिती अशी, युनूस शेख हे विरार पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना त्यांनी विकास झा याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी वसई यांच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव सादर करताना विकास झा याच्याविरुद्ध दाखल नसलेल्या, केवळ नावात साम्य असलेल्या ३ अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश केला. येथील मुनाफ बलोच याच्या हस्तक्षेपाने प्रभावित होऊन प्रस्तावाबरोबर जोडायची कागदपत्रे ही नियोजित हद्दपार इसमाचीच असल्याची खातरजमा न करता पूर्वग्रहदूषित हेतूने प्रेरित होऊन वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला. विकास झा याने वसई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर १० नोव्हेंबर २०१७ रोजी स्वत:ला जाळून घेऊन आत्महत्या केली होती. भावाला न्याय मिळावा, यासाठी दोन महिने प्रयत्न केल्यानंतर विकासचा भाऊ अमित झा याने २० जानेवारी २०१८ रोजी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मिळाल्यानंतरही त्यांनी इतक्या गंभीर प्रकाराची माहिती वरिष्ठांना वेळेत दिली नाही, असे त्यांच्यावर आरोप ठेवले. तसेच अमित झा याचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविण्यासाठी जबाबदार पोलीस अधिकाºयास न पाठविता कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला पाठविले, असे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले होते.
या विभागीय चौकशीच्या अहवालाचे निष्कर्ष लक्षात घेऊन पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी युनूस इस्माईल शेख यांच्या पगारातून २ वर्षे दरमहा १० हजार रुपये कपात करण्याची शिक्षा सुनावली आहे.