भोर तालुक्यात भात पेरणीला वेग
By Admin | Updated: June 2, 2014 01:20 IST2014-06-02T01:20:36+5:302014-06-02T01:20:36+5:30
तालुक्याचा पश्चिम भागात धूळवाफेवर भात पेरणीच्या कामाला वेग आला असून, शेतकरी कामात व्यस्त आहे.

भोर तालुक्यात भात पेरणीला वेग
भोर : तालुक्याचा पश्चिम भागात धूळवाफेवर भात पेरणीच्या कामाला वेग आला असून, शेतकरी कामात व्यस्त आहे. इंद्रायणी बियाणाला अधिक पसंती भोरच्या पश्चिम भागात आहे. दुर्गम डोंगरी भागात सुमारे ३५०० मिलिमीटर पाऊस पडतो. पावसावर भाताचे पीक अधिक चांगले येते. सुमारे ७४०० हेक्टर क्षेत्रावर तालुक्यात भाताची लागवड केली जाते. पैकी ७० टक्के क्षेत्र पश्चिम भागातील असल्याने या भागाला ‘भाताचे आगार’ समजतात. मार्च-एप्रिल महिन्यात झाडे-झुडपे तोडून राब करून तो वाळवून मे महिन्यात जमीन भाजून रोपांसाठी जमीन तयार करतात. खाचरांची डागडुजी झाल्यावर वळवाच्या पावसानंतर मे महिन्यात शेवटी भाताचे बी पेरतात. या वेळी वळवाचा पाऊस कमी झाल्याने आठवडाभर उशिरा पेरणी झाली. सद्या पश्चिम भागात भाताचे-बी पेरणीच्या कामाला वेग आला आहे. अधिक पाणी असल्याने गरव्या जातीच्या बियाणांची पेरणी करतात. यात सर्वाधिक इंद्रायणीला अधिक पसंती आहे. याचे उत्पन्न चांगले येते. पारंपरिक बियाणे कमी करून आधुनिक पद्धतीचा बियांणाचा वापरही शेतकरी करू लगले आहे. धूळवाफेवर बी पेरल्यावर उगवण तसेच लावणीही करून इतर कामेही लवकर होतात. (वार्ताहर)