क्रांतिकारकांचे कुटुंबीय येणार घुमानला
By Admin | Updated: March 23, 2015 00:57 IST2015-03-23T00:57:57+5:302015-03-23T00:57:57+5:30
शहीद शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय घुमान (पंजाब) येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

क्रांतिकारकांचे कुटुंबीय येणार घुमानला
पुणे : भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून लाहोरच्या तुरुंगात हसत-हसत फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव थापर आणि शहीद शिवराम हरी राजगुरू यांचे कुटुंबीय घुमान (पंजाब) येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
घुमान येथे ३ ते ५ एप्रिलदरम्यान ८८वे संमेलन होत आहे. या विषयी माहिती देताना स्वागताध्यक्ष भारत देसडला म्हणाले, ‘‘भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान बहुमूल्य आहे. सायमन कमिशनचा निषेध करताना लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिशांनी लाठीहल्ला केला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी या त्रिमूर्तींनी जॉन सँडहर्स्ट या इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला. त्यामुळे त्यांना २३ मार्च १९३१ रोजी फासावर चढविण्यात आले. त्यांचे क्रांतिकार्य ऐक्य, बलिदान व त्यागाचे प्रतीक आहे. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांच्या कुटुंबीयांना संमेलनाचे निमंत्रण दिले व त्यांनी ते स्वीकारले आहे.’’
भगतसिंगांचे पुतणे सरदार कुलतारसिंग यांचा मुलगा किरणजितसिंग सहारणपूर येथून येणार आहे. सुखदेव यांचे नातू अनुज थापर उत्तर प्रदेशातून येणार आहेत. राजगुरू यांचे पुतणे सत्यशील आणि स्नुषा आरती राजगुरू पुण्यातून संमेलनासाठी येणार आहेत. (प्रतिनिधी)