निवृत्त मेजरने वाचवले महिला व मुलांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 09:53 PM2018-07-21T21:53:51+5:302018-07-21T21:54:54+5:30

आयुष्याला कंटाळून तीन लहान मुलांसह कॅनॉलमध्ये उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या विवाहितेला लष्करातील एका निवृत्त मेजरने धाडस दाखवून चौघांचेही प्राण वाचवले.

Retired Major saved the lives of women and children | निवृत्त मेजरने वाचवले महिला व मुलांचे प्राण

निवृत्त मेजरने वाचवले महिला व मुलांचे प्राण

Next
ठळक मुद्देसुरेश भोसले हे १२ मराठा लाईट इन्फन्ट्रीमधून मेजर म्हणून २०१६ मध्ये निवृत्त

पुणे : आयुष्याला कंटाळून तीन लहान मुलांसह कॅनॉलमध्ये उडी टाकून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या विवाहितेला लष्करातील एका निवृत्त मेजरने धाडस दाखवून चौघांचेही प्राण वाचवले. मेजरने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली आणि नागरिकांना मदतीचे आवाहन केल्यानंतर जमावातील दोघांनी कॅनॉलकडे धाव घेतली होती. ही घटना बी़ टी़ कवडे रोडवर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली़. 
रेखा विजय लोंढे (वय २५, रा़  घोरपडी), जान्हवी लोंढे (वय ७महिने), तन्वी लोंढे (वय ६), गौरी लोंढे (वय ५) अशी त्यांची नावे आहेत. यातील सात महिन्यांची जान्हवी गंभीर असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धाडसाने प्राण वाचविणारे मेजर सुरेश भोसले, नायक सतीश गुंजाळ व विद्यार्थी अमित रावळ यांच्यामुळे या चौघांचे प्राण वाचू शकले़. 
याबाबतची माहिती अशी, सुरेश भोसले हे बीटी कवडे रस्त्याजवळील कॅनॉल जवळून जात होते. यावेळी त्यांच्या समोरुन एका महिला कडेवर ७ महिन्याची मुलगी तर, सोबत एक सहा वर्षाचा व एक आठ वर्षाचा मुलगा घेऊन जात होती. त्यावेळी महिलेने अचानक मुलांसह कॅनॉलमध्ये उडी मारली. हे पाहताच भोसले यांनी क्षणाचाही विचार न करता थेट पाण्यात उडी मारली. त्यांनी प्रथम सात महिन्याच्या बाळाला पकडून पाण्याबाहेर काढले़ यानंतर दोन्ही मुलांना पकडून पाण्यातून बाजूला घेत त्यांना एका आधारावर ठेवले आणि महिलेला वाचवायला धावले. मात्र बुडत असलेल्या महिलेने घाबरुन त्यांना मिठी मारली. यामुळे ते दोघेही बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात येताच भोसले यांनी तातडीने महिलेला दूर ढकलले व तिचे केस धरुन उलटे पोहत पाण्याच्या कडेला आधाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्यात जलपर्णी असल्याने कोणताच आधार मिळत नव्हता. तो पर्यंत कॅनोलच्या कडेला बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र, त्यातील कोणीही प्रत्यक्षात पाण्यात उतरण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे महिलेला वाचवण्यासाठी भोसले यांनी नागरिकांना अंगावरील जॅकेट एकमेकांना बांधून रस्सी तयार करण्याचे आवाहन केले. मात्र त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
 दरम्यान भासले यांना अखेर एक मुरुमाच्या टेकाडाचा आधार मिळाला. त्यांनी महिलेला त्यावर ठेऊन तिच्या पोटातील पाणी काढले. त्यानंतर तिला कॅनोलमधून बाहेर काढण्यासाठी नायक सतीश गुंजाळ व विद्यार्थी अमित रावळ यांनी मदत केली. कडेला आणल्यावर नागरिकांनी त्यांना रिक्षातून रुग्णालयात नेले. तोवर अग्निशमन दल व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुरेश भोसले यांनी वेळीच धाव घेतल्याने चौघांचेही प्राण वाचू शकले़. 
सुरेश भोसले हे १२ मराठा लाईट इन्फन्ट्रीमधून मेजर म्हणून २०१६ मध्ये निवृत्त झाले़ ते सध्या बी़ टी़ कवडे रोडवर रहात आहेत़. आज दुपारी ते कॅनॉलजवळून जात असताना लोकांचा आरडाओरडा ऐकून तेव्हा एक महिला वाहत जात असल्याचे पाहिल्यावर पाण्यात उडी मारुन त्यांचा जीव वाचविला असे भोसले यांनी सांगितले़. 

Web Title: Retired Major saved the lives of women and children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे