अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लष्करातून निवृत्त कर्नलची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Updated: November 18, 2023 17:47 IST2023-11-18T17:46:16+5:302023-11-18T17:47:13+5:30
लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली आहे.

अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत लष्करातून निवृत्त कर्नलची फसवणूक
पुणे : अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देउन लष्करातून निवृत्त झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला ३ लाख ७४ हजार रुपये ट्रान्स्फर करायला लावून फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ यादरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करातून निवृत्त झाले असून ते वाघोली परिसरात राहायला आहेत. त्यांना अनोळखी क्रमांकावरून व्हिडीओ आला. तो कॉल उचलल्यावर त्यावेळी समोर एक तरुणी कपडे काढत होती. फिर्यादी यांनी व्हिडीओ कॉल लगेच ठेवला. मात्र सायबर चोरट्याने तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला. त्यानंतर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना पैशाची मागणी केली.
पैसे देण्यास नकार दिल्यावर सायबर चोरट्याने वेगळ्या क्रमांकावरून फोन करून दिल्ली पोलीस मधून बोलत असल्याचे सांगितले. व्हिडीओ आक्षेपार्ह असून सोशल मीडियावर व्हायरल झाला तर खूप बदनामी होईल त्यामुळे तत्काळ ते व्हिडिओ डिलीट करून घ्या असे सांगितले. व्हिडीओ डिलिट करण्यासाठी वेळोवेळी ३ लाख ७४ हजार २३२ रुपये ट्रान्स्फर करायला भाग पडले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे करत आहेत.