कचरा प्रश्नावर तोडग्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर
By Admin | Updated: April 28, 2017 06:06 IST2017-04-28T06:06:04+5:302017-04-28T06:06:04+5:30
फुरसुंगी आणि उरुळी देवाची कचरा डेपोला आग लागल्यानंतर येथील ग्रामस्थांनी शहराच्या कचऱ्याची एक गाडीदेखील डेपोत येऊ न

कचरा प्रश्नावर तोडग्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर
पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची कचरा डेपोला आग लागल्यानंतर येथील ग्रामस्थांनी शहराच्या कचऱ्याची एक गाडीदेखील डेपोत येऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी गेल्या १३ दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून, ग्रामस्थांशी चर्चा करून याबाबत मार्ग काढा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना दिल्या आहेत.
ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे शहरात गेल्या १३ दिवसांपासून कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. शहराच्या अनेक भागांत कचऱ्याचे ढीग साठले असताना सर्व कचरा उचलला जात असल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. आग आटोक्यात आल्यानंतरदेखील येथील ग्रामस्थांनी डेपोत कचरा टाकण्यास विरोध केला आहे. शहरामध्ये दररोज सरासरी १५०० ते १६०० टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी सध्या सुमारे १००० टन कचरा प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकल्पांमध्ये पाठविण्यात येत आहे, तर शिल्लक ५५० ते ६०० टन कचरा दिशा प्रकल्पामध्ये साठवून ठेवण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
तोडग्यासाठी महापौर, सभागृह नेते, प्रशासन यांच्या वतीने ग्रामस्थांशी चर्चा सुरू आहे. त्यानंतरदेखील तोडगा न निघाल्याने पालकमंत्री गिरीश बापट व अन्य पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसोबत चर्चा करून मार्ग काढावा, अशा सचूना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.