अध्यक्षांची किंमत ठेवली नसल्यानेच राजीनामा
By Admin | Updated: October 3, 2015 01:43 IST2015-10-03T01:43:24+5:302015-10-03T01:43:24+5:30
साहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत दिली जात नाही

अध्यक्षांची किंमत ठेवली नसल्यानेच राजीनामा
प्रसन्न पाध्ये ल्ल पुणे
साहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत दिली जात नाही, हे वर्षातच जाणवल्याने परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. द. मा. मिरासदार यांनी केला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या बुधवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत परिषदेचे विद्यमान अध्यक्ष प्र. चिं. शेजवलकर यांनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. अध्यक्षांनीच पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल केल्याने साहित्य वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. सभेचे अध्यक्ष या नात्याने निवेदन करीत असताना शेजवलकर यांनी, माजी अध्यक्ष द. मा. मिरासदार यांच्या राजीनाम्यामागील कारणेही उघड केली होती. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने प्रा. मिरासदार यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनीही याला दुजोरा दिला.
ते म्हणाले, ‘‘पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक असे भांडण नव्हते. उगीच आरोप करायचे म्हणून सांगत नाही तर पदाधिकाऱ्यांचा कारभारच खटकत होता. त्याची जाहीर वाच्यता केली नाही. परिषदेत सत्ताकारण, राजकारण वाढू लागले होते.
म. श्री. दीक्षित, गं.ना. जोगळेकर यांच्याबरोबर काम केले त्या वेळी परिषदेत साहित्यिक वातावरण होते. ते कायम राहिले नाही असे जाणवल्याने परिषदेतून बाहेर पडलो. शेजवलकर यांनाही असाच अनुभव आला असावा. म्हणूनच त्यांनी भर सभेत पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली असावी.’’
मिरासदार म्हणाले, ‘‘अध्यक्षपाचा राजीनामा दिल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. परिषदेच्या कारभारात तुमच्या अनुभवाचा उपयोग होईल, असे सांगितले, पण मी निर्णयावर ठाम राहिलो.’’
महाराष्ट्र साहित्य परिषदेत पाच वर्षांपूर्वी सत्तापरिवर्तन झाल्यानंतर परिषदेच्या अध्यक्षपाची धुरा मिरासदार यांच्याकडे पुन्हा सोपविण्यात आली होती. त्यापूर्वीही मिरासदार परिदषेचे अध्यक्ष होते. म. श्री. दीक्षित, गं. ना. जोगळेकर यांच्या काळात मिरासदारच अध्यक्ष होते.
साहित्य परिषदेच्या परदेशवाऱ्या अनेक वेळा वादग्रस्त ठरल्या. घुमान येथील साहित्य संमेलनातही पदाधिकाऱ्यांनी ‘चमकोगिरी’ केली, असे आरोप केले जात आहेत. मिरासदार यांनाही हे अनुभव आले.
त्यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी यांनी याबाबतच्या काही कटू आठवणी सांगितल्या. मंकणी म्हणाल्या, ‘‘पहिले विश्वसंमेलन अमेरिकेत झाले, त्या वेळी दादा साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. कार्यक्रमात त्यांना व्यासपीठावर बोलाविलेच गेले नाही. वास्तविक इतर शाखांचे पदाधिकारी व्यासपीठावर होते. सिंगापूरला जेव्हा विश्व साहित्य संमेलन होणार होते, त्या वेळी त्यांना नेण्याचे टाळण्यात आले. पदाधिकाऱ्यांनीच त्यांची तब्येत बरी नसल्याचे कारण सिंगापूरच्या मंडळाच्या अध्यक्ष असलेल्या राजश्री लेले यांना सांगितले.’’
‘‘राजश्री ही दादांची विद्यार्थिनी असल्याने ती भारतात आली तेव्हा त्यांना भेटायला आली. त्या वेळी तिला सर्व प्रकार समजला. त्यानंतर तिने गणेशोत्सवात सिंगापूर येथे दादांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित केला. पुण्यात साहित्य संमेलन झाल्यानंतर ८२ लाख रुपये मिळविण्यासाठी दादांनाच पुढे करण्यात आले होते,’’ असे मंकणी यांनी सांगितले.