सफाई कामगार करणार कचरा विघटनांवर संशोधन
By Admin | Updated: February 3, 2015 00:59 IST2015-02-03T00:59:18+5:302015-02-03T00:59:18+5:30
शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर असून, महापालिकेने कोट्यवधीचे प्रकल्प उभारल्यानंतरही समस्या कायम आहे. त्याचा नाहक त्रास पुणेकरांबरोबर महापालिकेच्या सफाई कामगारांना होत आहे.

सफाई कामगार करणार कचरा विघटनांवर संशोधन
प्रियांका लोंढे ल्ल पुणे
शहरातील कचऱ्याची समस्या गंभीर असून, महापालिकेने कोट्यवधीचे प्रकल्प उभारल्यानंतरही समस्या कायम आहे. त्याचा नाहक त्रास पुणेकरांबरोबर महापालिकेच्या सफाई कामगारांना होत आहे. त्यामुळे पुणे महापालिका कामगार युनियनच्या सफाई कामगारांनी कचरा वर्गीकरण, विघटन व खत बनविण्यासाठी संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे शहरातून रोज सुमारे १६०० टन कचरा निर्माण होतो. सध्या स्थितीत ७० ते ८० टक्के कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी गावाच्या हद्दीत उघड्यावर डंपिंग केला जातो. त्यामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थ कचरा टाकण्यास विरोध करीत असून, अनेकदा आंदोलन करून कचरा डंपिंग बंद केले जाते. त्यामुळे विविध भागांत कचरा साचून राहतो. अस्ताव्यस्त कचऱ्याने दुर्गंधी पसरते. मग, नागरिकांकडून सफाई कामगारांना शिवीगाळ व मारहाणीचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्यावर महापालिकेतील नगरसेवक व अधिकाऱ्यांनी उपायोजना म्हणून सुमारे १००० टनाचा कचराप्रक्रिया प्रकल्प कोट्यवधी रुपये खर्चून उभारला. मात्र, हा प्रकल्प बंद पडला आहे.
महापालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करून प्रभागात जिरविण्याची योजना सुरू केली. परंतु, नागरिकांकडून त्याला योग्य प्रतिसाद मिळत नाही. मिश्र कचरा नागरिक प्लॅस्टिक पिशवीतून थेट कंटेनेरमध्ये टाकतात. कचऱ्यामध्ये मिथेन व कार्बन डायआॅक्साईडसारखे धोकादायक वायू असतात. मात्र, नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण व विघटन करीत नसल्याने सफाई कामगारांना समस्येला सामोरे जावे लागते.
यापूर्वी दिग्दर्शक अतुल पेठे यांच्या ‘कचराकोंडी’ व ‘सत्यशोधक नाटका’मध्ये पुणे युनियनच्या कामगारांनी उत्कृष्ट काम केले
आहे. मग, आपण संशोधनात
मागे का? कोणीतरी येऊन
आपली समस्या सोडवेल, याची
वाट न पाहता युनियनच्या सफाई कामगारांनी कचरा विघटनावर संशोधन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली संशोधन सहकारी (इंडसर्च) संस्था संशोधनासाठी
मदत करणार आहे. त्यासाठी
प्रशासन, सामाजिक व संशोधन क्षेत्रातील डॉ. आनंद करंदीकर, डॉ. मिलिंद भोई, डॉ. अर्चना मोरे, माजी महापालिका आयुक्त रमानाथ झा व डॉ. प्रेरणा राणे आदी १३ जणांची पहिली तज्ज्ञांची टीम कचरा विघटनाच्या संशोधनासाठी सफाई कामगारांना मदत करणार आहे. त्यासाठी कामगारांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती ज्येष्ठ कामगार नेत्या मुक्ता मनोहर यांनी दिली.
कचऱ्याच्या समस्येविषयी सर्वजण बोलतात, पण कचऱ्यामध्ये काम करणाऱ्या कचरा वेचकांच्या आरोग्याविषयी कोणीच बोलत नाही. कचऱ्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहिले पाहिजे. परंतु, अनेक वर्षे दुर्लक्षित घटकाने स्वत:ची समस्या संशोधन करून स्वत:च सोडविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी समाजातील याविषयांत काम करणाऱ्यांना आम्ही कचरा विघटन संशोधनात मदतीसाठी आवाहन केले आहे.
- मुक्ता मनोहर, ज्येष्ठ कामगार नेत्या