भोर तालुक्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
By Admin | Updated: July 27, 2015 04:01 IST2015-07-27T04:01:16+5:302015-07-27T04:01:16+5:30
तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ५०६ जागांच्या निवडणुकीसाठी १ हजार ७३३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी १ हजार

भोर तालुक्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
भोर : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ५०६ जागांच्या निवडणुकीसाठी १ हजार ७३३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली होती. त्यापैकी १ हजार ३३७ उमेदवारी अर्ज जमा करण्यात आले. छाननीत ४५ अर्ज बाद झाल्याने १ हजार २९२ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. माघारीच्या दिवशी ३५१ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ५०६ जागांसाठी ९४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तालुक्यातील १२ गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत, तर २७ ग्रामपंचायतीच्या निम्म्या जागा बिनविरोध झाल्या आहेत.
तालुक्यातील सर्वांत मोठ्या व शहराजवळ असणाऱ्या भोलावडे ग्रामपंचायतीसह वीसगाव खोऱ्यातील बाजारवाडी, आंबवडे विभागातील चिखलगाव, पान्हवळ, गुंजवणी खोऱ्यातील हातवे खुर्द, मोहरी खुर्द, तांभाड बिनविरोधची परंपरा असणारे भाटघर धरण भागातील म्हाळवडी, महामार्गावरील नायगाव, महुडे खोऱ्यातील गवडी, महुडे बुद्रुक व पोम्बर्डी ही बारा गावे बिनविरोध झाली आहेत, तर भाबवडी, चिखलावडे, देगाव, धावडी, गुणंद, हातवे बुद्रुक, मोहरी खुर्द, जोगवडी, जांभळी, कामथडी, खानापूर, कुसगाव, नांद नसरापूर, न्हावी १५, नऱ्हे, नाझरे, पिसावरे, संगमनेर, सावरदरे, शिवरे उंबरे, वर्वे बुद्रुक, माजगाव, वेनवडी, वडगाव डाळ, उत्रौली या ग्रामपंचायतींतील काहींच्या निम्म्या जागा, तर काहींच्या दोन-तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत. काही ग्रामपंचायतींत एक किंवा दोन जागांसाठी निवडणुका लागल्या आहेत. तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या राजकीय पुढाऱ्यांच्या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे सत्ताकेंद्र असल्याने नायगाव वगळता सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. या सर्व निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. ससेवाडी ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच धनाजी वाडकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी तयार करून कडवे आव्हान उभे केले आहे. एकेकाळी एकत्रित पॅनल करून ग्रामपंचायत जिंकणारे विद्यमान सरपंच धनाजी शिंदे व भोर बाजार समितीचे संचालक माऊली शिंदे या दोन मित्रांमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. माऊली शिंदे यांचे मागील १५ वर्षांपासून ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. या वेळी दोन्ही शिंदे बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कांजळे ग्रामपंचायतीतही शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशीच लढत आहे. विकासकामांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा शिवसेनेला विश्वास आहे. वर्वे खुर्द व वर्वे बुदुक गावांत काँग्रेस विरुद्ध सर्वपक्षीय पॅनल आहे. तर साळवडे गावात शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगणार आहे.
कामथडीत तीन जागा बिनविरोध झाल्या असून, काँगे्रस विरुद्ध सर्वपक्षीय पॅनल अशीच लढत होत आहे. महामार्गावरील सर्वांत मोठ्या असणाऱ्या वेळू ग्रामपंचायतीत ११ जागांसाठी २४ उमेदवार रिंगणात आहेत. माजी उपसभापती अमोल पांगारे विरुद्ध माजी सरपंच ज्ञानेश्वर पांगारे यांच्या पॅनलमध्ये लढत होत आहे. भाटघर धरणभागातील जोगवडी ग्रामपंचायतीत विद्यमान सरपंच सुभाष धुमाळ यांच्या विरोधात भ्रष्टाचार हटाव पॅनल उभे करण्यात आले आहे. या पॅनलचे वॉर्ड क्रमांक एक मधून कैलास गणपत धुमाळ हे बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. १५ वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर सुभाष धुमाळ यांचे वर्चस्व आहे. (वार्ताहर)