प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
By Admin | Updated: January 28, 2017 01:54 IST2017-01-28T01:54:05+5:302017-01-28T01:54:18+5:30
पोलीस मुख्यालयामध्ये रंगलेल्या दिमाखदार कार्यक्रमामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजवंदन

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पुणे : पोलीस मुख्यालयामध्ये रंगलेल्या दिमाखदार कार्यक्रमामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांसह संचलन करून मानवंदना देण्यात आली.
या वेळी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम्, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, प्रदीप देशपांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिवाजीनगरच्या पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कवायतीसाठी एकूण २४ तुकड्यांची रचना करण्यात आली होती. शहर पोलिसांसह वाहतूक शाखा, राज्य राखीव पोलीस दल, लोहमार्ग पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, गृह संरक्षक दल, नागरी संरक्षण दल, अग्निशामक दल तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या तुकड्यांनी संचलन केले. शहर व ग्रामीण पोलिसांच्या बँड पथकाने विविध धून वाजवून वातावरणनिर्मिती केली. कवायतीचे नेतृत्व सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले. त्यानंतर विविध शाळांमधील विद्यर्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या वेळी विविध घटकांतील वरिष्ठ अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.