पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उपचाराला न केल्याने रुग्णालयाला दोषी ठरवले आहे. तसेच डॉ सुश्रुत घैसास यांनी तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांकडून १० ते २० लाख मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यानंतर डॉ सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला आहे. अशातच काल आलेल्या एका अहवालातून रुग्णालयाने धर्मादायच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर भिसे यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठेवण्यात आला आहे. या बाबत धर्मादाय सह आयुक्तांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आल्याची माहिती सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून मिळाली आहे. या अहवालातील निष्कर्ष आणि तपशील पाहिल्यानंतर राज्य सरकार आता संबंधितांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. प्रसार माध्यमातून प्रकाशीत वृत्तांमूळे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणाचे तीव्र पडसात उमटले होते. विवध पक्ष, संघटनांकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी विधी व न्याय विभागातर्फे धर्मादाय सह आयुक्तांच्या नेतृत्वात नेमण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारला अहवाल दिल्याने आता मंगेशकर रुग्णालयावरील कारवाईची दिशा ठरणार आहे. त्यादृष्टीने हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. धर्मादाय सह आयुक्तांसह यमुना जाधव आणि इतर तीन अशा एकुण पाच सदस्यांचा या समितीत समावेश होता.
या प्रकरणी दिनानाथ रूग्णालयाचे डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला आहे. संचालक डॉ.केळकर यांनीही चूक झाल्याची कबूली दिल्याने आता राज्य सरकारकडून कारवाईला वेग आला आहे. अहवालानंतर पुढे काय कारवाई होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.