शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:11 IST2021-04-01T04:11:56+5:302021-04-01T04:11:56+5:30
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या २५ एप्रिल रोजी घेतली जाणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली ...

शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांना दिलासा
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या २५ एप्रिल रोजी घेतली जाणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अनेक विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने आता राज्यातील सर्व जिल्ह्यांत येत्या २३ मे रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थी पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून शाळा कोरोनामुळे बंद आहेत. विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग घेतानासुध्दा अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर काही शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांचे वेगळे व स्वतंत्र वर्ग सुरू केले होते. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अनेकांसाठी दिलासादायक ठरला आहे.
--
पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. मात्र, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत केव्हा सुधारणा होणार आणि परीक्षा केव्हा होणार याबाबतही विद्यार्थी व पालकांमध्ये चिंता आहे.
----
- २५ एप्रिल २०२१ रोजी होणार होती परीक्षा
- आता २३ मे रोजी होणार परीक्षा
- अर्ज करण्यास ३० मार्चपर्यंत होती मुदत
- शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आता १० एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज
---
असा करा परीक्षेसाठी अर्ज
विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत, असे आवाहन परीक्षा परिषदेतर्फे देण्यात आले आहे.