मारकुट्या पालकांच्या तावडीतून मुलींची सुटका
By Admin | Updated: May 31, 2014 07:25 IST2014-05-31T07:25:58+5:302014-05-31T07:25:58+5:30
किरकोळ कारणांवरून पोटच्या दोन मुलींना बेदम मारहाण करणार्या मारकुट्या पालकांच्या तावडीतून दोन लहान मुलींची चाईल्ड लाईन व कोंढवा पोलिसांनी सुटका केल्याची घटना नुकतीच घडली

मारकुट्या पालकांच्या तावडीतून मुलींची सुटका
पुणे : किरकोळ कारणांवरून पोटच्या दोन मुलींना बेदम मारहाण करणार्या मारकुट्या पालकांच्या तावडीतून दोन लहान मुलींची चाईल्ड लाईन व कोंढवा पोलिसांनी सुटका केल्याची घटना नुकतीच घडली. या पालकांना पोलिसांनी समज दिली असून, या मुलींना काही काळ निरीक्षणगृहात ठेवून पुन्हा घरी पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगरमधील एका नऊ वर्षीय मुलीने चाईल्ड लाईन संस्थेकडे फोनवरून आपल्या मैत्रिणीला व तिच्या बहिणीला तिचे वडील दररोज बेदम मारहाण करीत असल्याची तक्रार केली. तिच्याकडून मिळालेल्या पत्त्यावर संस्थेचे सोनाली मोरे आणि सागर गुरव या दोन स्वयंसेवकांनी या मुलींच्या घरी धाव घेतली. दोन मुलींपैकी एका मुलीला आईवडिलांनी येरवड्यातील घरी ठेवले होते. तर दुसरी मुलगी घरी होती. महिला पोलीस कर्मचारी दीपाली मटकर यांच्या मदतीने या दोघींचीही सुटका करून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तेव्हा या मुलींच्या हातांवर, पायांवर व चेहर्यावर माराच्या खुणा होत्या. या मुलींचे वडील एक गॅरेज चालवतात. तर आई सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. त्यांना तीन अपत्ये आहेत. यातील एका मुलीचे वय १२ वर्षे, तर दुसरीचे वय ८ वर्षे आहे. त्यांना तिसरा मुलगा आहे. कोंढवा पोलिसांच्या खडी मशीन पोलीस चौकीमध्ये या पालकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. तेव्हा उद्विग्न झालेल्या वडिलांनी चौकीमध्येच विष पिण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी मुलींच्या आईला तक्रार देण्याचे आवाहन केले; परंतु तिने तक्रार देण्यास नकार दिला. त्यानंतर या मुलींबाबत घडलेल्या घटनेची माहिती महिला व बालकल्याण विभागाला कळविण्यात आली. पुन्हा मुलींना मारहाण करणार नाही, या हमीवर या मुलींना पुन्हा पालकांकडे सुपूर्द करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)