शिरसाई उपसामधून आवर्तन सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:10 IST2021-05-27T04:10:30+5:302021-05-27T04:10:30+5:30
शिर्सुफळ तलावातून डाव्या कालवा व उजव्या कालवा अशा दोन कालव्यांतून पाणी सोडण्यात आले असून, आठ-दहा दिवस पाणी चालू असणार ...

शिरसाई उपसामधून आवर्तन सोडले
शिर्सुफळ तलावातून डाव्या कालवा व उजव्या कालवा अशा दोन कालव्यांतून पाणी सोडण्यात आले असून, आठ-दहा दिवस पाणी चालू असणार आहे. डाव्या कालव्याला ३ पंपांद्वारे व उजव्या कालव्याला ३ पंपांद्वारे पाणी सोडण्यात आले. उजव्या कालव्यातून सोनवडी, जळगाव, अंजनगाव, कारखेल तर डाव्या कालव्यातून उंडवडी कडेपठार, जराडवाडी, गोजुबावी, बऱ्हाणपुर, उंडवडी सुपे या गावांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
जिरायती भागात गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. डिसेंबरनंतर रब्बी हंगामात बागायत क्षेत्रात वाढ होऊन पीकरचना बदलली. त्यामुळे पाण्याचा उपसा वाढल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे सध्या पाण्याअभावी भूईमूग, मका, कडबा इतर पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती. त्याचबरोबर ग्रामस्थांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. शिरसाईचे आवर्तन सुरू झाल्याने शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लाभार्थी क्षेत्रातील शेतकऱ्यांना २२ हजार ५०० रुपये पर एमसीएफटी दराने ५० टक्केहून अधिक प्रमाणात पाणी मिळणार आहे. मागील थकीत पाणीकराच्या ५० टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावयाची आहे. तसेच चालू पाण्याची १०० टक्के रक्कम भरल्यावरच पाणी मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्थेला ७ नंबरचा फॉर्म भरून पाण्याची मागणी करून सहकार्य करावे, अशी विनंती पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अमोल शिंदे यांनी केली आहे.
बारामतीच्या जिरायती भागात शिरसाई उपसा योजनेतून आवर्तनाला सुरुवात झाली.
२६०५२०२१-बारामती-०१