चिमुकलीचा मृतदेह सोडून नातेवाईक परागंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:09 IST2021-05-15T04:09:19+5:302021-05-15T04:09:19+5:30

पुणे : वेळेत उपचार न मिळाल्याने घरातच मृत्यू झालेल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह सोडून नातेवाईक गावाकडे निघून गेल्याचा प्रकार ...

Relatives leave Chimukali's body | चिमुकलीचा मृतदेह सोडून नातेवाईक परागंदा

चिमुकलीचा मृतदेह सोडून नातेवाईक परागंदा

पुणे : वेळेत उपचार न मिळाल्याने घरातच मृत्यू झालेल्या नऊ वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह सोडून नातेवाईक गावाकडे निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत्यूपश्चात ससून रुग्णालयात या मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. पोलिसांनी माणुसकी दाखवत कैलास स्मशानभूमीमध्ये या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. रुग्णालयात दाखल करण्यास उशीर झाल्याने या मुलीला प्राण गमवावे लागल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीमध्ये एक दाम्पत्य राहण्यास आहे. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब मूळ लातूर जिल्ह्यातील आहे. या दाम्पत्यामधील महिलेची नऊ वर्षांची बहीण एक महिन्यापूर्वी लातूरहून त्यांच्याकडे राहण्यास आली होती. मागील काही दिवसांपासून ही मुलगी आजारी पडली होती. आजारी असलेल्या या मुलीला तिचा मेव्हणा आणि बहीण मंगळवारी नांदेड सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पोलिसांनी तिची तपासणी केली असता मुलगी तपासणीपूर्वीच मृत्युमुखी पडल्याचे सांगितले.

याबाबत हवेली पोलीस ठाण्याला माहिती कळविली. पोलीस हवालदार दिलीप गायकवाड यांनी मृतदेह ससून रुग्णालयात हलवीत शवविच्छेदन करून घेतले. याठिकाणी मृतदेहाची अँटिजन तपासणी केली. ही तपासणी पॉझिटिव्ह आली. दरम्यान, पोलिसांनी नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. ससूनमधील पंचनामा, मृत्यू दाखला आदी सोपस्कार पूर्ण झाल्यावर नातेवाईकांनी आम्ही अंत्यविधी करतो असे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांना मयत पास देखील काढून दिला. पोलीस पुन्हा पोलीस ठाण्यात परतले. मात्र, हा मृतदेह ताब्यात न घेताच बहीण आणि मेव्हणा कोणालाही न कळविता गावी निघून गेले.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी पोलिसांना ससूनमधून पुन्हा पोलिसांना याबाबत माहिती कळविली. पोलीस हवालदार गायकवाड यांनी ससूनमध्ये जाऊन कागदपत्रांची पूर्तता करीत मृतदेह ताब्यात घेतला. पालिकेच्या कैलास स्मशानभूमीमध्ये या मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

--

उपचार देण्यात दिरंगाई का झाली ?

या मुलीचा दवाखान्यात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे या मुलीला वेळीच उपचार मिळाले नाहीत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासोबतच तिची कोरोना चाचणी नातेवाईकांनी का केली नाही आणि तिला उपचार देण्यात दिरंगाई का झाली असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Relatives leave Chimukali's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.