पालिका रुग्णालयाच्या खासगीकरणास मान्यता
By Admin | Updated: August 13, 2014 04:20 IST2014-08-13T04:20:01+5:302014-08-13T04:20:01+5:30
महापालिकेच्या मालकीचे आणि गेली अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या खराडी येथील हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.

पालिका रुग्णालयाच्या खासगीकरणास मान्यता
पुणे : महापालिकेच्या मालकीचे आणि गेली अनेक वर्षे धूळ खात पडलेल्या खराडी येथील हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीत मंजूर करण्यात आला.
हे रुग्णालय चालविण्यासाठी पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत स्थायी समितीने या खासगीकरणास मान्यता दिली आहे. मात्र, दुसरीकडे बोपोडी येथील हॉस्पिटलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीत अमान्य करण्यात आला. त्यामुळे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा पालिकेत आहे. मात्र, या रुग्णलयात पालिकेच्या शहरी गरीब योजना तसेच लोकप्रतिनिधींना वैद्यकीय सुविधांव्यतिरिक्त इतर कोणतीही सेवा मिळणार नाही.
पालिकेस आरक्षणाच्या हॉस्पिटलच्या इमारती आर ७ अंतर्गत मिळालेल्या आहेत. या हॉस्पिटलमध्ये आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ही हॉस्पिटल्स सुरू करण्यात आलेली नाहीत. पालिकेच्या ताब्यात असलेली ही हॉस्पिटल्स खासगीकरणाद्वारे चालविण्यासाठी देण्याचे पालिकेचे धोरण आहे. त्यानुसार खराडी आणि बोपोडी येथील हॉस्पिटल्स खासगीकरणाद्वारे चालविण्यास देण्याची निविदा प्रक्रिया प्रशासनाने राबविली होती. हे प्रस्ताव आजच्या बैठकीसमोर होते. (प्रतिनिधी)