पैलवानांचा उल्लेख ‘बैल’ असा केल्याने आक्षेप
By Admin | Updated: February 6, 2017 05:57 IST2017-02-06T05:57:38+5:302017-02-06T05:57:38+5:30
एका खासगी मराठी वाहिनीवर सध्या मोठ्या प्रमाणात गाजत असलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत नंदिता वहिनी या पात्राच्या तोंडातून अनेक वेळा

पैलवानांचा उल्लेख ‘बैल’ असा केल्याने आक्षेप
पौड : एका खासगी मराठी वाहिनीवर सध्या मोठ्या प्रमाणात गाजत असलेली ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत नंदिता वहिनी या पात्राच्या तोंडातून अनेक वेळा पैलवान पात्र असलेल्या राणा यास ‘बैल’ व ‘बैला’ला असा एकेरी उल्लेख केलेला असल्याने त्याचा हा उल्लेख टाळला जावा, याकरिता महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी संलग्न असलेल्या मामासाहेब मोहोळ कुस्ती महासंघ पुणे जिल्हा यांनी आक्षेप घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना पुणे जिल्हा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोहोळ व उपाध्यक्ष सागर तांगडे यांनी सांगितले, की पैलवानक्षेत्राला प्राचीन परंपरा असून महाभारतकाळापासून कुस्तीला राजमान्यता होती. स्वातंत्र्यलढ्याच्या काळातही अनेक राष्ट्रपुरुष पैलवान होते. तसेच छत्रपतींच्या काळातही पैलवान असलेल्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी बलिदान केले आहे. मधल्या काळात हा खेळ केवळ अडाणी व अशिक्षितांचाच खेळ असल्याचा चुकीचा गैरसमज निर्माण केला गेला, त्याचाच परिणाम म्हणून ‘तुझ्यात जीव रंगला’सारख्या मालिकांमधून पैलवानांना बदनाम करण्याचे धाडस केले जात आहे.
अलीकडील काळात तर जागतिक स्तरावर कुस्तीचा स्वीकार केला गेला आहे. विजय चौधरीसारखे डबल पोस्ट ग्रॅज्युएट झालेले उच्चशिक्षित व तिहेरी महाराष्ट्र केसरीचा मान मिळविलेले हजारो मल्ल या क्षेत्रात आपले करिअर निर्माण करीत असताना मनोरंजनक्षेत्राच्या माध्यमाने होणाऱ्या बदनामीचा आम्ही निषेध करतो.
संबंधित वाहिनी व मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांशी संपर्क करून पैलवानांचा सातत्याने बैल व सर्व पैलवान बैल असतात, असा उल्लेख करण्याचे थांबविण्यास सुचविले आहे. अन्यथा संबंधित वाहिनीच्याविरोधात निषेध केला जाणार आहे. (वार्ताहर)