एसटी अभावी प्रवाशांचे हाल
By Admin | Updated: August 13, 2014 04:46 IST2014-08-13T04:46:05+5:302014-08-13T04:46:05+5:30
अपु-या एस.टी. बस संख्येमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. राजगुरुनगर बसस्थानकातून खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी. बस भरगच्च भरून जातात.

एसटी अभावी प्रवाशांचे हाल
दावडी : अपु-या एस.टी. बस संख्येमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. राजगुरुनगर बसस्थानकातून खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या एस.टी. बस भरगच्च भरून जातात. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध यांचे हाल सुरूआहेत. तातडीने आगार प्रशासनाने दखल घेऊन जादा गाड्या सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात जाणारी एस.टी. बससेवा तोकडी पडत आहे. दावडी, वाफगाव, गुळाणी, खरपुड, चिखलगाव, येणवे, आंबोली, डेहणे, वाडा, पाईट, कडूस, शेलपिंंपळगाव या गावातील अनेक विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी तालुक्याच्या गावी येतात. तसेच कामानिमित्त येणारे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध यांची संख्या मोठी आहे. स्थानकातून सुटणाऱ्या एस.टी. बसची संख्या कमी आहे. एस.टी.चालकाला चालक केबीनमध्ये प्रवाशी बसल्याने एस.टी. बस चालवण्यात अडथळे येतात. विशेषत: एस.टी. बसमध्ये जागा मिळविण्यासाठी महिला व मुलींची मोठी कुचंबणा होते. गर्दीचा फायदा घेऊन चोरटे खिशातील पाकिटे व महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवतात. त्यामुळे प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो.पासधारक विद्यार्थ्यांना एस. टी. बसमध्ये जागा मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून ये-जा करावी लागत आहे. ग्रामीण भागात बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)