मरेपर्यंत जगण्यासाठी कारण मिळालं

By Admin | Updated: January 20, 2016 00:45 IST2016-01-20T00:45:58+5:302016-01-20T00:45:58+5:30

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती करून देण्यासाठी मकरंद अनासपुरे मला घेऊन बीडला गेला. त्या वेळी तिथं कडेवर लहान पोरं, कपाळावर कुंकू नसणाऱ्या आणि पांढरी साडी नेसलेल्या शंभर

The reason for living up to the death is found | मरेपर्यंत जगण्यासाठी कारण मिळालं

मरेपर्यंत जगण्यासाठी कारण मिळालं

पिंपरी : शेतकऱ्यांच्या प्रश्नांची माहिती करून देण्यासाठी मकरंद अनासपुरे मला घेऊन बीडला गेला. त्या वेळी तिथं कडेवर लहान पोरं, कपाळावर कुंकू नसणाऱ्या आणि पांढरी साडी नेसलेल्या शंभर ते दोनशे मुली मला दिसल्या. मी अस्वस्थ झालो. मी बाप म्हणून विचार केला, इथं जर माझी मुलगी असती, तर मी काय केले असते? हे सर्व घडत असताना आपण काय करू शकतो, याची जाणीव झाली आणि नाम संस्था उभी राहिली. त्यातून मरेपर्यंत जगण्यासाठी कारण मिळालं, असे भावुक उद्गार प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी काढले. सामाजिक जाणीव त्यांच्या मनोगतातून वृद्धिंगत झाली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने चिंचवड येथील बिग सिनेमा येथे पुणे आंतरराष्ट्रीय विस्तारित चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव, खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, विरोधी पक्षनेते विनोद नढे, महोत्सवाचे समन्वयक प्रवीण तुपे, माजी महापौर मोहिनी लांडे, योगेश बहल, नगरसेवक सुलभा उबाळे, समीर मासूळकर, सुजाता पालांडे, नंदा ताकवणे, वैशाली काळभोर, श्याम आगरवाल, अभियंता प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. चित्रपट महोत्सवात नाना पाटेकर यांनी अभिनय, पिंपरी-चिंचवडशी असणारा ऋणानुबंध, नामच्या माध्यमातून सुरू असणारे काम, संवेदनशीलता यावर भाष्य केले. सामाजिक जाणीव वृद्धिंगत केली. पाटेकर म्हणाले, ‘‘भवताल माणसाच्या आयुष्यावर परिणाम करीत असतो. नटाला टिकून राहण्यासाठी खूप द्यावे लागते. सुख-दु:खाकडे पाहण्याची दृष्टी विकसित करावी लागते. कला ही जगायची असते. ग्लिसरीन डोळ्यांत टाकून येणारी आसवं आणि मनाला भिडल्यानंतर व्यक्तीच्या अंतरंगातून समोर येणारी भूमिका खरी वास्तववादी असते. आसवांचे गम्य आणि गंमत कळायला हवी. आपण जेव्हा हसत असतो, त्या वेळी वेदनाही मनाला भिडायला हवी. अभिनेत्याने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांना कैद केल्यासच ती भूमिका मनाला थेट भिडते. शब्दांपेक्षा भूमिकेचे मौन अधिक बोलायला हवे. लेखकाने लिहिलेल्या दोन शब्दांमधील अंतरात रसिकांना बांधून ठेवण्याची खरी ताकद असते.’’
पोस्टर लागतात
आणि फाडलेही जातात
आयुक्त राजीव जाधव यांनी चित्रपट क्षेत्राविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचे चिरंजीव अभिनेते रितेश देशमुख यांचे उदाहरण दिले. विलासरावांनी आयुष्यभर काम करूनही जेवढी प्रसिद्धी मिळवली नाही, तेवढी केवळ चित्रपट माध्यमामुळे रितेशला मिळाली. ही कलेची किमया आहे, असे आयुक्त म्हणाले. त्यावर नाना पाटेकर म्हणाले, ‘‘या क्षेत्रात जसे लवकर पोस्टर लागतात, तसे फाडलेही जातात. विलासरावांनी जे काम केले, ते स्थायी आहे. त्याची तुलना होऊ शकत नाही.’’
प्रतिमा चव्हाण, अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
> नाना पाटेकर म्हणाले, ‘‘न मागताही सातवा वेतन आयोग मिळतो. एका प्राध्यापकाचा पाचशेचा पगार सुमारे दीड लाखापर्यंत जातो. मात्र, त्या तुलनेत बळीराजाचे काय झाले? उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. शेतीला आजही हमीभाव नाही. काय करायचे त्याने? आपण दु:ख वाटून घेण्याची भावना ठेवायला हवी. आजपर्यंत मिळालेल्या पुरस्कारांपेक्षा मला नामच्या कामातून आनंद मिळत आहे. चित्रपट असो की नाटक, त्यात अभिनय नसतो. ती एक अनुभूती असते. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायला हवा. तो रस्त्यावर आणू नये.’’
बदलत्या सामाजिक परिस्थितीविषयी पाटेकर म्हणाले, ‘‘आपण भवतालकडे पाहायला हवे. घरापलीकडे पाहायला हवे. आकाश, शिवार हे संगळे नाहीसे होऊन आपण स्क्वेअर फुटामध्ये अडकलो आहोत. कुणी पाचशे फुटांच्या, तर कोणी हजार-दोन हजार फुटांच्या घरांच्या कबरी बांधल्या आहेत. त्यात बळीराजाची वेदना पोहोचत नव्हती. माझेही तसेच होते. आता कुठं तरी या गोष्टी समाजासमोर ठेवण्याची सुरुवात केली आहे. आता कुठं तरी गवसतंय. कालपर्यंत जे केले, ते सर्व आता मोडीत काढले आहे.’’

Web Title: The reason for living up to the death is found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.