RCB च्या विजयानंतर चाहत्यांचं पुण्यात बेशिस्त सेलिब्रेशन; हुल्लडबाजीने गालबोट (VIDEO)
By किरण शिंदे | Updated: June 4, 2025 01:41 IST2025-06-04T01:39:42+5:302025-06-04T01:41:23+5:30
पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव हटवला आणि वाहतूक सुरळीत केली.

RCB च्या विजयानंतर चाहत्यांचं पुण्यात बेशिस्त सेलिब्रेशन; हुल्लडबाजीने गालबोट (VIDEO)
पुणे : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी RCB चाहत्यांनी जल्लोष केला. विशेषतः फर्ग्युसन रस्त्यावर गुडलक चौक परिसरात आरसीबी चाहत्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या जल्लोषाला काही ठिकाणी गालबोट लागल्याचे चित्र दिसून आले.
रविवार रात्री साधारणपणे बारा ते साडेबाराच्या दरम्यान, फर्ग्युसन रस्त्यावर आरसीबीच्या चाहत्यांचा जल्लोष सुरु होता. अनेकांनी फटाके फोडले, गाड्यांवरून ध्वज फडकावत घोषणाबाजी केली. यावेळी काही अति उत्साही युवकांनी रस्त्यावरच डान्स करत वाहतूक रोखून धरली. त्यामुळे गुडलक चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आरसीबी चाहत्यांच्या या अति उत्साहीपणामुळे सामान्य नागरिक आणि अन्य वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
RCB च्या विजयानंतर चाहत्यांचं पुण्यात बेशिस्त सेलिब्रेशन; हुल्लडबाजीने गालबोट (व्हिडिओ- किरण शिंदे) pic.twitter.com/Po8jdOz9Ze
— Lokmat (@lokmat) June 3, 2025
जल्लोषाच्या नावाखाली रस्त्यावर सुरू असणाऱ्या या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. हुल्लडबाजी करणाऱ्या आणि रस्ता रोखून धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांना पोलीस समजावत होते. परंतु काही युवक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव हटवला आणि वाहतूक सुरळीत केली.