पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला यांची निवड निश्चित
By Admin | Updated: February 12, 2016 03:36 IST2016-02-12T03:36:00+5:302016-02-12T03:36:00+5:30
पुण्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची महासंचालकपदी पदोन्नती होणार असल्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला यांची निवड निश्चित झाली आहे. एका केंद्रीय मंत्र्यासह

पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला यांची निवड निश्चित
पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांची महासंचालकपदी पदोन्नती होणार असल्यामुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी रश्मी शुक्ला यांची निवड निश्चित झाली आहे. एका केंद्रीय मंत्र्यासह स्वत: मुख्यमंत्र्यांनी शुक्ला यांच्या नावाला हिरवा कंदील दिल्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शुक्ला यांच्या नियुक्तीचे आदेश होतील.
मुंबईपाठोपाठ सर्वाधिक महत्त्वाचे आयुक्तालय असलेल्या पुण्याचे पोलीस आयुक्तपद हा पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांसाठी मानाचा विषय असतो. यापूर्वी पुण्याचे आयुक्तपद भूषवलेले धनंजय जाधव, सत्यपाल सिंह हे मुंबईचे आयुक्त झाले होते. पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या बदलीनंतर सतीश माथूर यांच्यावर आयुक्तपदाची धुरा सोपवण्यात आली होती. सत्ताबदल झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नागपूरचे पोलीस आयुक्त असलेले के. के. पाठक यांची बदली
पुण्यामध्ये करण्यात आली होती. या बदलीचीही मोठी चर्चा पोलीसवर्तुळात होती.
पोलीस आयुक्त के. के. पाठक मार्चअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. त्याआधी त्यांची बढती प्रस्तावित आहे. केवळ एक महिन्यांसाठी पोलीस महासंचालक होऊन ते निवृत्त होतील.
एक महिन्यासाठी शासनाकडून पुणे आयुक्तालयाचे पद उन्नत करून महासंचालक दर्जाचे करण्यात येणार असल्याची अटकळ
बांधण्यात येत होती. पाठक यांनीही त्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न केल्याचे बोलले जात होते. मात्र, गृहविभागातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने पदोन्नतीने पाठक यांची बदली करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. आयुक्तपदासाठी दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसळकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजयकुमार वर्मा, अतिरिक्त महासंचालक संजय बर्वे यांचीही नावे चर्चेत होती.
गृह विभागातील सूत्रांनुसार, शुक्ला यांच्या नावावर शासनाने शिक्कामोर्तब केले असून, केवळ आदेश होण्याचा अवकाश आहे. रश्मी शुक्ला या १९८८ च्या बॅचच्या आयपीएस आहेत.
भूगोल विषयात एम. ए.पर्यंत त्यांचे शिक्षण झालेले आहे. त्या सध्या महाराष्ट्र गुप्तवार्ता विभाग (एसआयडी) प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांची पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यास पुण्याच्या त्या दुसऱ्या महिला पोलीस अधिकारी ठरतील.