अल्पवयीन मुलीवर राहू येथे बलात्कार

By Admin | Updated: August 28, 2014 04:17 IST2014-08-28T04:17:11+5:302014-08-28T04:17:11+5:30

राहू (ता. दौंड) येथे सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करणारा हा तिचा जवळचा नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले आहे

Rape on a minor girl at Rahu | अल्पवयीन मुलीवर राहू येथे बलात्कार

अल्पवयीन मुलीवर राहू येथे बलात्कार

यवत : राहू (ता. दौंड) येथे सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्कार करणारा हा तिचा जवळचा नातेवाईक असल्याचे निष्पन्न झाले आहे. यवत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ही घटना गुरुवार (दि.२१) रोजी पहाटे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान राहू (ता. दौंड) येथे पीडित मुलीच्या घराजवळ उसाच्या शेतात घडली. याप्रकरणी आरोपी बाबू विश्वनाथ घोलवड याला यवत पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली.
सदर पीडित मुलीचे आई-वडील ऊसतोडणी कामगार आहेत. गुरुवारी रात्री सगळे झोपलेले असताना मुलगी पहाटेच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर गेली होती. तेव्हा आरोपीने मुलीला जवळच्या उसाच्या शेतात नेऊन बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी मुलगी अस्वस्थ असल्याने तिच्या आईने तिला राहू येथील खासगी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. तेथून मुलीला यवतमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. बलात्काराची घटना असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्याना आल्याने पीडित मुलीला पुणे येथील ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर सदर मुलीवर बलात्कार झाल्याची ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यवत पोलिसांना संपर्क साधून माहिती दिली. यवत पोलिसांनी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, जवळचा नातेवाईक असलेला आरोपी बाबू विश्वनाथ घोलवड याने बलात्कार केल्याची माहिती मिळाली. (वार्ताहर)

Web Title: Rape on a minor girl at Rahu