राजपूर येथे रानभाजी महोत्सव आदिवासी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:14 IST2021-08-18T04:14:00+5:302021-08-18T04:14:00+5:30
तालुक्याच्या पश्चिम भागातील राजपूर येथे कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव यांचे संयुक्त ...

राजपूर येथे रानभाजी महोत्सव आदिवासी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
तालुक्याच्या पश्चिम भागातील राजपूर येथे कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव यांचे संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाची सुरवात आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांचे प्रतिमापूजन करुन झाली. या रानभाजी महोत्सव आयोजन करण्यामागील महत्त्व व उद्देश प्रास्ताविकामध्ये तालुका कृषि अधिकारी टी. के. चौधरी यांनी विशद केले. यानंतर कृषि विज्ञान केंद्र नारायणराव येथील शास्त्रज्ञ योगेश यादव यांनी रानभाजी यांचे आहारातील महत्त्व व औषधी गुणधर्म याबाबत महिला व शेतकरीवर्गाला माहिती दिली. या वेळी कमल लोहकरे व राहीबाई उंडे यांनी रानभाजी ओळख व पाककृती याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. तद्नंतर कांताराम लोहकरे यांनी रानमेव्याचे पदार्थ याविषयी व अरविंद मोहरे यांनी रानभाजी संवर्धन याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये लोतीची भाजी, चिचूरडा,रानकेळी भाजी,भोकर भाजी, काटेमाठ, कुर्डुची भाजी,चायचा बार,रताळ्याचे पानाचं भजी,करवंदाच लोणचं कारळा /खुरासनी चटणी /कोंड नाचणीची भाकर मोहाची फुले -रानमेवा,धामण फळ -रानमेवातांदळाची खीर आमटी असे पदार्थ तयार करुन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
या कार्यक्रमास शेतकरी महिला बचत गटांनी सहभाग घेतला होता. यात चाळीस विविध रानभाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. तसेच विविध रानभाज्यांची पक्वान्न या वेळी महोत्सवात सादर करण्यात आले. या कार्यक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद व सहभाग नोंदविलेल्या सर्व महिला बचत गट व शेतकरी गटांचे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी लक्ष्मण मोहरे यांनी दहा रानभाज्यांचे पक्वान्न बनवून प्रदर्शनात उपलब्ध करुन दिले. या वेळी डिंभा मंडळातील सर्व कर्मचारी व आत्मा प्रवर्तक मनोज पाबळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.
या वेळी राजपूरच्या सरपंच कमल लोहकरे, तळेघरचे सरपंच चंद्रकांत उगले, सदस्य दुंदा जढर, चंदर लोहकरे, पोलिस पाटील उत्तम वाघमारे, आदिवासी समाज कृती समिती संस्थापक अध्यक्ष सीताराम जोशी, सुनीता लोहकरे, डिंभे मंडल कार्यालयाचे सर्व कर्मचारी, आठ महिला बचत गटातील महिला सदस्य व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
-आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील राजपूर येथे रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला.