रामदास ठाकूर यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर

By Admin | Updated: September 13, 2014 05:28 IST2014-09-13T05:28:57+5:302014-09-13T05:28:57+5:30

खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास ठाकूर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे

Ramdas Thakur gets disbelief resolution | रामदास ठाकूर यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर

रामदास ठाकूर यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर

राजगुरुनगर : खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास ठाकूर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सभापती ठाकूर यांच्यावरील अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी आज पुणे येथील साखर संकुलात बाजार समितीच्या संचालक मंडळाची विशेष सभा, जिल्हा उपनिबंधकांनी बोलावली होती, त्या सभेत हा निर्णय झाला.
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास ठाकूर यांच्यावर १२ संचालकांनी अविश्वासाचा ठराव जिल्हा उपनिबंधकांकडे १ सप्टेंबर रोजी दाखल केला होता. त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी आज संचालक मंडळाची विशेष सभा बोलाविली होती. सर्वश्री दिलीप मोहिते पाटील, उपसभापती धारू गवारी, रमेश पवार, रमेश राळे, विलास कातोरे, कैलास गाळव, रवींद्र बोराटे, दशरथ गाडे, दत्ता भेगडे, पोपट पोटे आणि हिराबाई लिंभोरे व कुसुम वाळुंज यांच्या अविश्वासाच्या ठरावावर सह्या होत्या. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजीनगरच्या साखर संकुलात आज सकाळी साडेअकरा वाजता ही सभा झाली.
सभेस ठाकूर यांच्यासह ठरावावर सह्या केलेले १२ संचालक हजर होते. पाच जण गैरहजर होते. सभेत विलास कातोरे यांनी अविश्वास ठराव मांडला. दशरथ गाडे यांनी त्यास अनुमोदन दिले. उपस्थित १३ पैकी १२ जणांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले. स्वत: ठाकूर यांनी विरोधात हात वर केला. ठराव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा लागतो. त्याप्रमाणे निर्वाचित १८ पैकी १२ जणांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर झाला. (वार्ताहर)

Web Title: Ramdas Thakur gets disbelief resolution